नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांचे निलंबन ‘पूर्वनियोजित’ होते आणि त्याचा ‘हत्यारा’सारखा वापर करण्यात आला. सत्ताधारी पक्ष संसदेच्या कार्यपद्धतीची मोडतोड करत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर केला.

संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणे आणि खासदारांचे निलंबन याबाबत सभापती धनखड यांनी पाठविलेल्या दुसऱ्या पत्राला खरगे यांनी उत्तर दिले. सभागृहातील गोंधळ मुद्दाम आणि रणनीतीचा भाग असल्याचा आरोप धडखड यांनी केला होता. त्यास खरगे यांनी आक्षेप घेतला. धनखड यांनी खरगे यांना आपल्या निवासस्थानी चर्चेसाठी बोलावले आहे.

हेही वाचा >>> खरगे ‘इंडिया’चा पंतप्रधानपदाचा चेहरा? नितीश कुमारांच्या नाराजीची चर्चा; म्हणाले, “मी बैठकीत स्पष्ट सांगितलं…”

काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले की, जर सरकार सभागृह चालवण्यास उत्सुक नसेल तर सभापतींच्या निवासस्थानी चर्चा करण्यास काही अर्थ नाही. खासदारांचे निलंबन मनमानी पद्धतीने अमलात आणले गेले. सभागृहाचे संरक्षक म्हणून सभापतींनी संसदेत सरकारला जबाबदार धरण्याच्या नागरिकांच्या अधिकाराचे रक्षण केले पाहिजे. सत्ताधारी पक्षाने खासदारांचे निलंबनाचे हत्यार लोकशाहीला क्षीण करणे, संसदीय कार्यपद्धती मोडीत काढणे आणि राज्यघटनेची गळचेपी करण्याचे सोयीस्कर साधन म्हणून वापरले आहे. सभापतींचे पत्र संसदेबद्दल सरकारच्या निरंकुश आणि अहंकारी वृत्तीचे समर्थन करते. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी काही विशेषाधिकार प्रस्तावही शस्त्र म्हणून वापरले जात असतील तर संसदेला कमजोर करण्यासाठी सत्ताधारी कारभाराची ही जाणीवपूर्वक केलेली रचना आहे अशी नाराजी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण बॅनर्जीचा हल्लाबोल

संसदेच्या आवारात उपाध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केल्याचे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी समर्थन केले आहे. नक्कल हा अभिव्यक्तीचाच प्रकार असून तो मूलभूत अधिकार असल्याचा दावा त्यांनी केला. मतभेद व निषेध करणे हेही मूलभूत अधिकार आहेत, तसेच नक्कल हाही मूलभूत अधिकार असून कुणीही या अधिकाराचा विध्वंस करू शकत नाही, असे ते म्हणाले.