राजस्थानमध्ये सचिन पायलट गट विरुद्ध अशोक गेहलोत गट असा काँग्रेसमधील अंतर्गत वाद अद्यापव शमण्याचं नाव घेत नाहीये. २०२०मध्ये मध्य प्रदेशात झालेल्या सत्ताबदलापासून सचिन पायलट भाजपामध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यापाठोपाठ राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील अंतर्गत सत्तासंघर्ष वाढतच गेल्याचं दिसून आलं आहे. नुकतंच सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांचं नाराजीनाट्यही राजस्थानसोबतच देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं होतं. आता राजस्थानमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अशोक गेहलोत यांनी एकमेकांचं कौतुक केल्यानंतर त्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. सचिन पायलट यांनी त्यासंदर्भात सूचक विधान केलं आहे.

मोदी म्हणतात, “अशोक गेहलोत देशातील…”

राजस्थानच्या बासवाडा जिल्ह्यातील मानगड धाम परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हजेरी लावली होती. यावेळी “पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात जिथे कुठे जातात, तिथे त्यांचा सन्मान होतो”, असं गेहलोत म्हणाले होते. त्यापाठोपाठ मोदींनीही त्यांचं कौतुक केलं होतं. “अशोक गेहलोत आणि मी मुख्यमंत्री म्हणून एकत्र काम केलं होतं. ते देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. त्याशिवाय ते अनुभवी राजकारणीही आहेत”, असं मोदी म्हणाले होते.

सचिन पायलट यांचं सूचक विधान

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशोक गेहलोत यांचं कौतुक केल्याबाबत बोलताना सचिन पायलट यांनी सूचक विधान केलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. मला वाटतं हा फार महत्त्वपूर्ण घटनाक्रम आहे. अशाच प्रकारे पंतप्रधानांनी संसदेत गुलाम नबी आझाद यांचं कोतुक केलं होतं. त्यानंतर काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे आता पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं ही बाब विशेष आहे. ही घटना आपण सहजपणे घ्यायला नको”, असं सचिन पायलट म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुलाम नबी आझाद यांना दुसऱ्यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात न आल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. राहुल गांधींच्या नेतृत्वावरूनही त्यांनी टीका केली होती. या सगळ्या घडामोडींच्या आधी पंतप्रधानांनी गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे आता अशोक गेहलोत हेही गुलाम नबी आझाद यांच्या वाटेनेच जाणार, असा सूचक इशाराच सचिन पायलट यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे.