नवी दिल्ली : राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणातील काही भाग वगळण्यात आल्याच्या मुद्दय़ावरून शुक्रवारी वरिष्ठ सभागृहात वादंग माजला. विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या घोषणाबाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी बाकांवरून ‘मोदी-मोदी’चा जयघोष करण्यात आला. अखेर सभापती जगदीप धनखड यांना सभागृह नेते पीयुष गोयल आणि खरगे या दोघांनाही दोन्हीकडील सदस्यांना शांत करण्याचे आवाहन करावे लागले.

सभागृहात नियमांचे उल्लंघन होऊ देणार नाही, अशी भूमिका धनखड यांनी घेतली. मात्र, शब्द वगळण्याच्या मुद्दय़ावर काँग्रेसह विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरील चर्चेत खरगेंनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित केलेल्या भाषणातील सहा मुद्दे कामकाजातून वगळण्यात आले.

त्यावर, खरगेंसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. ‘भाषणात वापरलेले काही शब्द मोदींनीही उच्चारले होते. माझ्या भाषणातील शब्द असंसदीय नाहीत. मग, हे शब्द का वगळण्यात आले’, असा प्रश्न खरगेंनी सभागृहात उपस्थित केला. ‘आम्ही आमचे मुद्दे तुम्हाला उद्देशून नव्हे तर, केंद्र सरकारला उद्देशून मांडत असतो’, असे खरगे म्हणाले. काँग्रेसचे सदस्य प्रमोद तिवारी यांनी वृत्तांकनातून वगळण्यात आलेले शब्द कंसामध्ये तसेच ठेवले जातात. पण, यावेळी ते शब्द पूर्णपणे काढून टाकले गेले आहेत. ही नवी पद्धत योग्य नसल्याचे सांगितले.

विरोधी पक्ष नेत्यांच्या भाषणांमधून अदानी समूहाच्या कथित घोटाळय़ाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली गेली. मात्र, केंद्र सरकारने त्यावर कोणतेही जाहीर भाष्य केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणातदेखील अदानी समूहाच्या आर्थिक प्रकरणाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे या प्रकरणावरून पुन्हा आक्रमक होण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला. राज्यसभेत शुक्रवारी विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीची मागणी केली. विरोधकांकडून ‘जेपीसी’ तर, सत्ताधाऱ्यांकडून ‘मोदी-मोदीं’ची घोषणाबाजी केली गेली.

पुरावे फक्त आम्हीच द्यायचे?

२००५ मध्ये यूपीएच्या काळात ‘कॅश फॉर व्होट’चा घोटाळा केल्याची टीका मोदींनी लोकसभेतील भाषणात केली होती. मात्र, प्रकरणात ११ पैकी सहा खासदार भाजपचे होते व त्यांना अपात्र ठरवण्याच्या प्रस्तावावरील मतदानावेळी भाजपने सभात्याग केला होता. हा प्रस्ताव प्रणव मुखर्जी व तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मांडला होता, असा दावा करत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केला. नरेंद्र मोदी यांचे म्हणणे असत्य असून तेसुद्धा  कामकाजातून वगळणार का, असा सवाल रमेश यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेरो-शायरी, ‘अदानी’ शब्दही वगळला- खरगे 

संसदेच्या सभागृहात केलेल्या भाषणातील भाग कामकाजातून काढून टाकण्याच्या कृतीमुळे विरोधक शुक्रवारी संतप्त झाले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाषणातील वगळलेले शब्द वाचून दाखवले. गप्प बसला आहात, राजधर्म, मौनीबाबा, अदानी समूह, वॉशिंग मशीन, मित्रकाल यातील कुठले शब्द असंसदीय आहेत, असा सवाल खरगेंनी केला. संसदेमध्ये शेरो-शायरी खूप पूर्वीपासून केली जाते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीही शेरो-शायरी करत असत. मी वाचून दाखवलेल्या शायरीच्या नऊपैकी सहा ओळी कामकाजातून काढल्या गेल्या. ही तर शायरी आहे, साहित्य आहे, तेही कामकाजातून काढले जात आहे. मग, स्वातंत्र्य राहिले कुठे? कंपनीचे नाव अदानी असेल तर कंपनीचे नाव घ्यावेच लागणार, तेही वगळले गेले. अदानी प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीमध्ये चुकले कुठे, असाही सवाल खरगेंनी विचारला.