नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर कोणीही शंका घेतलेली नाही, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे काँग्रेसच्या ‘जी-२३’ गटाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी सोनिया यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले. मात्र, बंडखोर गटाने नेतृत्वाच्या मुद्दय़ावर भूमिका जाहीर केल्यानंतर गांधी कुटुंबानेच पक्षांतर्गत बंडाळी थोपवण्यासाठी आझाद यांच्याशी संवाद साधल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस पक्ष बळकट करायचा असेल तर, पक्षाचे नेतृत्व आणि निर्णयप्रक्रियेपासून गांधी कुटुंबातील सदस्यांनी दूर राहिले पाहिजे, अशी कठोर आणि आक्रमक भूमिका कपिल सिबल यांनी जाहीरपणे घेतली होती. आझाद यांनी मात्र, शुक्रवारी सबुरी दाखवली. सोनिया यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केल्यानंतर त्यांनी, पक्षांतर्गत मतभेदांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. आझाद यांनी सोनियांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असला तरी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी- वढेरा यांच्याबाबत त्यांनी टिप्पणी केलेली नाही. बंडखोर नेत्यांशी समन्वय साधण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गांधी कुटुंबाने भेट घडवून आणल्याचे मानले जाते.

गेल्या रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत कोणीही सोनिया यांना पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले नाही. त्यांच्या नेतृत्वाबद्दल कुणाचेही दुमत नाही. आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे कशा लढवायच्या, यावर सोनियांशी चर्चा केली, असे आझाद यांनी स्पष्ट केले. सोनियांशी झालेली ही नियमित भेट होती, त्यात काहीही नावीन्य नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षाध्यक्षांना भेटत असतात, तशीच मीही त्यांची भेट घेतली, असे आझाद यांनी पत्रकारांना सांगितले. ‘जी-२३’ गटाच्या सलग दोन दिवस झालेल्या बैठकीनंतर पहिल्यांदाच आझाद यांनी सोनियांशी चर्चा केली, त्यामुळे या भेटीबद्दल उत्सुकता होती.

कार्यकारिणी समितीच्या बैठकीत सोनिया यांनी, गांधी कुटुंबातील सदस्य आपल्या पदांचा राजीनामा देतील, असा प्रस्ताव ठेवला होता, मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर संतप्त झालेल्या ‘जी-२३’ गटाच्या सदस्यांनी स्वतंत्र बैठका घेऊन बंडखोरांची भूमिका निवेदनाद्वारे स्पष्ट केली. ‘‘काँग्रेसची पक्ष संघटना मजूबत करायची असेल तर पक्षाच्या सर्व स्तरांवर समावेशक आणि सामूहिक निर्णयप्रकिया राबवली पाहिजे आणि हाच एकमेव पर्याय आहे. काँग्रेसला सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न असून पक्षाचे महत्त्व कमी करण्याचा उद्देश नाही’’, असे ‘जी २३’ गटातील सदस्यांचे म्हणणे आहे. बंडखोरांच्या बुधवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर सोनिया यांनी गुलाम नबी आझाद यांच्याशी संपर्क साधला होता.

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि ‘जी २३’ गटातील सदस्य भूपेंदर हुडा यांनी गुरुवारी राहुल यांची भेट घेतली होती. बंडखोर नेत्यांचे राहुल गांधी यांच्या निर्णयप्रक्रियेसंदर्भातील आक्षेपही स्पष्टपणे त्यांच्यापुढे मांडण्यात आले. राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी, पक्षातील निर्णय राहुल यांच्या संमतीशिवाय होत नाहीत. हे निर्णय नेमके कसे घेतले जातात, हे कोणालाही माहीत नसते. अनेकदा प्रसारमाध्यमांमधून त्यांची माहिती मिळते. ही प्रक्रिया योग्य नाही. सामूहिक निर्णयप्रक्रियेशिवाय काँग्रेसला पर्याय नाही, हा मुद्दाही राहुल यांच्यापुढे मांडण्यात आला होता.

उत्तर प्रदेशसह पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर, पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा अपेक्षित होती मात्र, त्यातून काही ठोस हाती न लागल्याने ‘जी-२३’ गटातील नेते पक्षाच्या नेतृत्वाच्या मुद्यावर पुन्हा सक्रिय झाले आहेत. या गटामध्ये गांधी निष्ठावान मणिशंकर अय्यर आणि आत्तापर्यंत तटस्थ राहिलेले शशी थरूर आदी नेतेही सहभागी झाले आहेत. दीड वर्षांपूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षनेतृत्व व संघटनात्मक बदलाची मागणी केली होती.

सोनियांवर विश्वास राहुल यांच्याबाबत मौन

आझाद यांनी सोनियांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असला तरी, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याबाबत कोणतीही टिप्पणी केलेली नाही. ‘जी २३’ नेत्यांचा मुख्य आक्षेप राहुल यांच्या पक्षातील निर्णयप्रक्रियेवरील प्रभावाबद्दल आहे. राहुल अध्यक्षपदावर नसले तरी सर्व निर्णय त्यांचाच संमतीने होतात, असेही बंडखोर नेत्यांचे मत आहे.

संवादासाठी..

काँग्रेसच्या बंडखोर ‘जी-२३’ नेत्यांनी एकत्र येऊन सर्व स्तरांवर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्व आणि निर्णय घेण्याचे आवाहन करणारे निवेदन जारी केल्यानंतर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची निवासस्थानी भेट घेतली. ही भेट म्हणजे बंडखोरांशी समन्वयाचा गांधी कुटुंबाचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.

गेल्या रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत कोणीही सोनिया यांना पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले नाही. आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे कशा लढवायच्या, यावर सोनियांशी चर्चा केली.

– गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते, काँग्रेस</p>

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coordination efforts discussion congress president sonia gandhi g 23 leader ghulam nabi azad ysh
First published on: 19-03-2022 at 01:03 IST