लॉकडाउननंतर मुंबईतील रेड लाइट ठिकाणे बंद ठेवल्‍यास करोनाच्या २१ टक्‍के केसेस टाळता येऊ शकतील असा दावा येल स्‍कूल ऑफ मेडिसीन व हार्वर्ड मेडिकल स्‍कूलमधील शिक्षणतज्ञांच्‍या अहवालात करण्यात आला आहे. मुंबईतील रेड लाइट ठिकाणे बंद केल्‍यास ६० दिवसांमध्‍ये करोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूचे प्रमाण २८ टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. देशभरात याची अमलबजावणी केल्‍यास ४५ दिवसांमध्‍ये करोनाच्‍या केसेसमध्‍ये ७२ टक्‍क्‍यांनी घट होऊ शकते आणि ६० दिवसांमध्‍ये मृत्‍यूंचे प्रमाण ६३ टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते. तसंच लॉकडाउनपासून वाढत असलेल्‍या केसेसच्‍या प्रमाणामध्‍ये १७ दिवसांचे अधिक अंतर निर्माण होऊ शकते असंही अहवालात सांगण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वॉशिंग्‍टन येथील येल स्‍कूल ऑफ मेडिसीन आणि हार्वर्ड मेडिकल स्‍कूलमधील शिक्षणतज्ञांनी ‘मॉडेलिंग दि इफेक्‍ट ऑफ कन्टिन्‍यू क्‍लोजर ऑफ रेड-लाइट एरियाज ऑन कोविड-१९ ट्रान्समिशन इन इंडिया’ या विषयावर आधारित संशोधन पूर्ण केले. या संसोधनानुसार, करोनासाठी प्रभावी उपचार किंवा लस विकसित करेपर्यंत लॉकडाउननंतर रेड लाइट ठिकाणे बंद ठेवल्‍यास भारतीयांना करोनाची लागण होण्‍याचा धोका खूपच कमी आहे. यामुळे नागरिकांना करोनाची लागण होण्‍याचा धोका कमी होण्यात मदत होईल.

येल स्‍कूल ऑफ मेडिसीनद्वारे करण्‍यात आलेल्‍या संशोधनाचे निष्‍कर्ष भारत सरकार व विविध राज्य सरकारांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. तसेच इन्स्टिट्यूटने त्‍यांना देशामध्‍ये लॉकडाऊन शिथील केल्‍यानंतर देखील रेड-लाइट क्षेत्रे (आरएलए) बंद ठेवण्‍याचा सल्‍ला दिला आहे. यामुळे ४५ दिवसांच्‍या कालावधीमध्‍ये केसेस ७२ टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकतात आणि केसेस वाढण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये १७ दिवसांचे अंतर निर्माण होऊ शकते. भारत लॉकडाऊन ४.०च्‍या दिशेने जात असताना केसेस वाढण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये अंतर निर्माण झाल्‍यास सरकारला सार्वजनिक आरोग्‍य व अर्थव्‍यवस्‍थेच्‍या संरक्षणासाठी योग्‍य उपाययोजनांचे नियोजन करण्‍यासाठी अधिक वेळ व संधी मिळेल. संशोधन निदर्शनास आणते की, रेड-लाइट ठिकाणे बंद ठेवल्‍यास लॉकडाऊन संपल्यानंतरच्‍या पहिल्‍या ६० दिवसांमध्‍ये मृत्‍यूंचे प्रमाण ६३ टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते.

राष्‍ट्रीय एड्स नियंत्रण संस्‍थेच्‍या (एनएसीओ) मते, भारतामध्‍ये जवळपास ६,३७,५०० लैंगिक कर्मचारी आहेत आणि पाच लाखांहून अधिक ग्राहक दररोज रेड-लाइट ठिकाणांना भेट देतात. रेड-लाइट ठिकाणे खुली करण्‍यास सुरूवात केली तर आजार झपाट्याने पसरत जाईल आणि अधिकाधिक लैंगिक कर्मचारी व ग्राहकांना संसर्ग होईल. शारीरिक संबंध ठेवताना सोशल डिस्टन्सिंग राखणे शक्‍य नसल्‍यामुळे संसर्ग होण्‍याचे प्रमाण अधिक असेल. संसर्गित ग्राहकामुळे इतर लाखो नागरिकांपर्यंत आजार पसरत जाईल. याचा अर्थ रेड लाइट ठिकाणांमुळे संसर्गाचे अधिक हॉटस्‍पॉट निर्माण होऊ शकतात. हे हॉटस्‍पॉट लॉकडाउन संपल्‍यानंतर देखील मोठ्या प्रमाणात आजार पसरवू शकतात. यापासून नागरिकांचे संरक्षण करण्‍यासाठी संशोधन पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळापर्यंत रेड लाइट ठिकाणे बंद ठेवण्‍याचा सल्‍ला देण्यात आला आहे.

येल स्‍कूल ऑफ मेडिसीन येथील बायोस्‍टॅटिस्टिक्‍सचे प्राध्‍यापक आणि सह-लेखक डॉ. जेफरी टाऊनसेंड यांनी सांगितलं आहे की, ”लॉकडाउन संपल्‍यानंतर रुग्‍णांमध्‍ये वाढ होण्‍याची खूप शक्यता आहे. म्‍हणूनच सुधारित दृष्टिकोनाची गरज आहे. वास्‍तविक स्थिती व्‍यक्‍तींच्‍या वर्तणूकीवर अवलंबून असेल आणि आमचे मॉडेल व्‍यक्‍ती कशाप्रकारे वर्तणूक करतील याबाबत अंदाज करत नाही. आमच्‍या मॉडेलिंगचा हेतू भविष्‍यात काय घडेल याबाबत अंदाज करण्‍याचा नाही, तर भविष्‍यातील हस्‍तक्षेपाचे परिणाम जाणून घेण्‍याबाबत आहे. आमच्‍या संशोधनातील निष्कर्ष निदर्शनास आणतात की, विशेषत: लॉकडाऊन संपल्‍यानंतर रेड-लाइट ठिकाणे बंद ठेवण्याची सर्वाधिक गरज आहे.”

इतर देशांनी देखील अशाच हस्‍तक्षेपांची अंमलबजावणी केली आहे. ऑस्‍ट्रेलियामध्‍ये कुंटणखाने व स्ट्रिप क्‍लब्‍स हे व्‍यवसाय देशातील कामकाज पूर्ववत करण्‍याच्‍या योजनेमध्‍ये अनिश्चित कालावधीपर्यंत बंद ठेवण्‍यात आले आहेत. जर्मनी व नेदरलँड्सने देखील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी कुंटणखाने बंद ठेवली आहेत. जपानने वेळेत रेड लाइट क्षेत्रे बंद केली नाहीत आणि रेड लाइट क्षेत्रामुळे केसेसच्‍या प्रमाणामध्‍ये ”भडका” उडाला आणि स्‍थानिक हॉस्पिटल्‍समधील रूग्‍णांची संख्‍या ”मोठ्या प्रमाणात” वाढली.

भारतातील कोविड-१९ स्थितीबाबत बोलताना अहवालाचे सह-लेखक मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील औषध विभाग व हार्वर्ड मेडिकल स्‍कूलचे डॉ. सुधाकर नुती म्‍हणाले, ”भारतीय सरकारने कोविड-१९ केसेसचे प्रमाण वाढण्‍याला प्रतिबंध करण्‍यासाठी लवकर केलेल्‍या उपाययोजनांमुळे देशातील संसर्गाचे प्रमाण कमी आहे. रेड लाइट ठिकाणे बंद ठेवल्‍यास सरकारने लॉकडाउनमध्‍ये प्राप्‍त केलेल्‍या यशाला अधिक फळ मिळेल. भारताने लॉकडाऊनदरम्‍यान आजार वाढण्‍याच्‍या अंतरामध्‍ये जवळपास ४० दिवसांचे यश प्राप्‍त केले आणि रेड लाइट क्षेत्रे बंद ठेवल्‍यास यामध्‍ये आणखी १७ दिवसांची भर होऊ शकते. केसेस वाढण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये अंतर निर्माण करण्यासाठी करण्‍यात आलेले कोणतेही प्रयत्‍न वैद्यकीय यंत्रणेवरील तणावाचे प्रमाण कमी करते आणि परिणामत: अशा प्रयत्‍नांमुळे लोकांचे जीव वाचण्‍यामध्‍ये मदत होते. रेड लाइट क्षेत्रे पुन्‍हा सुरू केल्‍याने रुग्‍णांमध्‍ये होणा-या संभाव्‍य वाढीला प्रतिबंध केल्‍यास लॉकडाऊनमध्‍ये प्राप्‍त झालेल्‍या यशाचे संरक्षण होईल.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus lockdown india could avoid 72 per cent of cases after lockdown by closing red light areas sgy
First published on: 16-05-2020 at 15:19 IST