करोनाने जगभरामध्ये थैमान घातलं आहे असं असतानाच आपल्यापैकी अनेकजण बातम्यांच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग आणि त्यासंदर्भातील माहिती रोज पाहत आहेत. मात्र जगभरामध्ये सध्या चर्चेचा प्रमुख विषय असणाऱ्या या करोनाच्या संसर्गाबद्दल काही लोकांना अजिबातच कल्पना नाही. अमेरिकेमध्येही करोनामुळे १० हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र येथील काही तरुणांचा ग्रुप ग्रँड कॅन्यन भागामध्ये २५ दिवसांचा ट्रेक करुन परतल्यानंतर त्यांना करोनाबद्दल समजले आहे. करोनाने १८० हून अधिक देशांमध्ये थैमान घातलं असून त्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे हे त्यांना ठाऊकच नव्हतं.

ग्रँड कॅन्यन येथे हा ग्रुप राफ्टींगसाठी गेला होता. या लोकांनी मागील २५ दिवसांमध्ये ग्रँड कॅन्यन ते कोलोरॅडो नदीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. मात्र या कालावधीमध्ये त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नव्हता. त्यामुळेच त्यांना करोनासंदर्भात काहीच माहिती नव्हती. या करोनाच्या साथीमध्ये आपला इतर जगाशी संबंध आला नाही याचा एक प्रकारे आम्हाला आनंदच असल्याचे हे लोक सांगतात. या २५ दिवसांच्या कालावधीमध्ये या तरुणांनी आपले मोबाईलही बंद ठेवले होते. केवळ एका मोबाईलवरुन घरच्यांना मेसेज पाठवून हे लोक आपण ठीक असल्याचं कळवतं होते.

(फोटो सौजन्य: मासोन थॉमस याच्या फेसबुकवरुन)

मात्र त्यांनी २५ दिवसांमध्ये २८० मैल अंतर कापत आपला नियोजित राफ्टींग ट्रेल पूर्ण केला. या ट्रेलच्या शेवटच्या ठिकाणी त्यांना राफ्टींग कंपनीचा कर्मचारी भेटला त्यानेच या लोकांना जगभरामध्ये सुरु असणाऱ्या करोनासंदर्भातील घडामोडींची प्राथमिक माहिती दिली. देशातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे, दुकानांमध्ये टॉयलेट पेपरसारख्या गोष्टींसाठी भांडणं होत आहे, अनेक देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत हे सर्व ऐकून या तरुणांना आधीच विश्वासच बसत नव्हता. या कर्मचाऱ्याने माहिती दिल्यानंतर ज्या मोबाईलवरुन हे लोकं मेसेज करत होते त्या मोबाईलवर आलेले मेसेज पाहिले असताना ग्रुपमधील अनेकांच्या नातेवाईकांनी तातडीने फोन करण्यास सांगितल्याचे मेसेजेस त्यांना दिले.

या २५ दिवसांच्या दौऱ्यावर गेलेल्या ग्रुपमधील सदस्य असणाऱ्या मासोन थॉमस याने ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला यासंदर्भात माहिती दिली. “कॅननमध्ये जाण्यापूर्वी मला वाटणारी शेवटची गोष्ट अशी होती की: याबद्दल काहीही करू शकत नाही. आम्ही परत आल्यावर कदाचित सर्व गोष्टी आहे तशा नसतील. मला वाटलं की हे वाईट झालं तर इतकचं वाईट होईल की आम्हाला वारंवार आमचे हात धुवावे लागतील. मात्र सध्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे. याचा आम्ही विचारही केला नव्हता,” असं थॉमस म्हणाला.

(फोटो सौजन्य: मासोन थॉमस याच्या फेसबुकवरुन)

थॉमची प्रेयसी केट कॉन्डीनो ही सुद्धा या भटकंतीसाठी गेली होती. “सध्याची परिस्थिती आम्हाला खरी वाटत नाहीय. हे सर्वकाही एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे घडत असल्याचा भास होतोय. आम्ही परत येऊ तेव्हा सर्व काही ठीक असेल असं आम्हाला वाटलं होतं,” अशी प्रतिक्रिया केटने नोंदवली आहे.

जगभरामध्ये १३ लाख ५९ हजारहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ७५ हजार ९०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ९३ हजार ४०० हून अधिक लोकं या आजारामधून पूर्णपणे बरी झालेली आहेत.