‘भारत बायोटेक’च्या कोव्हॅक्सिन लशीचा आपत्कालीन वापराच्या लशींमध्ये समावेश करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता निश्चित करण्यासाठी आणखी माहिती हवी आहे.

प्रमाणित पद्धतींना बगल देऊन घाईने ‘कोव्हॅक्सिन’ला मान्यता देता येणार नाही. त्यासाठी आणखी माहिती सादर करणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 

कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी ‘डब्ल्यूएचओ’च्या शिफारशीची प्रतीक्षा असली तरी निकष, नियम डावलता येणार नाहीत. या लशीची शिफारस करताना तिची सुरक्षितता आणि परिणामकारकता यांचा परिपूर्ण आढावा घ्यावा लागणार आहे. या संदर्भात ‘डब्ल्यूएचओ’च्या तांत्रिक सल्लागार गटाची २६ ऑक्टोबरला बैठक होणार आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी ट्वीट संदेशाद्वारे दिली.

 भारत बायोटेकने लशीबद्दल सर्व माहिती दिलेली नाही. आतापर्यंत दिलेल्या माहितीचे विश्लेषण जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी केले आहे. पण ती माहिती पुरेशी नाही. सर्व माहितीचे मूल्यमापन केल्यानंतरच या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देता येईल, असेही डॉ. स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले. 

आपत्कालीन वापराच्या लशींमध्ये कोव्हॅक्सिनचा समावेश करण्यासाठी माहिती परिपूर्ण असल्याशिवाय तिचा दर्जा, सुरक्षितता आणि परिणामकारकता ठरवता येणार नाही. याशिवाय कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांना ही लस योग्य आहे की नाही हे ठरवावे लागणार आहे. आम्ही या लशीच्या संदर्भात उपस्थित केलेल्या शंकांना कंपनीने उत्तरे देणे गरजेचे आहे. त्यानंतर तांत्रिक सल्लागार गट त्याचे मूल्यमापन करील, असे  ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे. 

कोव्हॅक्सिनला चाचण्यांची कागदपत्रे तपासून मान्यता देण्यात येईल. त्यावर समिती काम करीत आहे. भारत बायोटेककडून आणखी माहिती मागवण्यात येत आहे, असे डॉ. स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले.

‘डब्ल्यूएचओ’ने आणखी माहिती मागविली

कोव्हॅक्सिनच्या जागतिक आपत्कालीन वापरासाठी या लशीबद्दलची माहिती परिपूर्ण हवी. त्याशिवाय तिचा दर्जा, सुरक्षितता आणि परिणामकारकता ठरवता येणार नाही.

अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांना ही लस योग्य आहे की नाही हे निश्चित करावे लागणार आहे. आम्ही या लशीच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना कंपनीने उत्तरे देणे गरजेचे आहे.

प्रमाणित पद्धती, निकष, नियम यांना बगल देऊन घाईघाईत ‘कोव्हॅक्सिन’ला मान्यता देता येणार नाही. त्यासाठी आणखी माहिती सादर करणे आवश्यक आहे.