चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने थैमान घातलेलं असताना भारतासह संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. चीनमधील करोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. दरम्यान एम्सचे माजी संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी जानेवारीच्या पहिल्या १४ दिवासंमध्ये देशातील करोनाच्या स्थितीवरुन परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येईल असं सांगितलं आहे. Moneycontrol ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनमध्ये करोनाचा नवा उपप्रकार बीएफ.७ आढळला असून रुग्णसंख्या वाढली आहे. भारतात करोनाची लाट येण्याच्या शक्यतेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले “देशात करोनाची नेमकी काय स्थिती असेल याचा अंदाज घेण्यासाठी जानेवारी महिन्यातील पहिले १४ दिवस महत्त्वाचे असतील. लोक प्रवासात असून पुन्हा परतत असल्याने हा कार्यकाळ महत्त्वाचा असेल”.

चीनमधून येणाऱ्यांना करोना चाचणी अनिवार्य; जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंडहून येणाऱ्यांनाही ‘आरटी-पीसीआर’ अहवाल सक्तीचा

“लोक प्रवास करुन परत आल्यानंतर पाच ते सात दिवसांचा कार्यकाळ लक्षणीय असतो. प्रवासात संसर्ग होण्याची भीती असल्याने यानंतर देशातील करोना रुग्णांची संख्या वाढत आहे की नाही याचा अंदाज येईल,” असं डॉक्टर गुलेरिया म्हणाले आहेत.

करोनास्थितीवर नजर ठेवण्याची गरज आहे असा सल्ला देताना गुलेरिया यांनी २०१९ मधील घटनाक्रम सांगितला. “चीनमधील नववर्षामुळे याची सुरुवात झाली होती. संसर्ग झालेले वुहानमधील अनेकजण इटली आणि युरोपमध्ये प्रवास करत होते. यानंतर युरोपमध्ये आणि खासकरुन इटलीत अचानक रुग्णवाढ झाली होती. याचा परिणाम पुढील अनेक महिने, आठवडे दिसत होता,” असं गुलेरिया म्हणाले.

दरम्यान गुलेरिया यांनी लसीकरण झालेले लोक प्रवास करु शकतात असं सांगताना करोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. “ज्यांनी बुस्टर डोस घेतलेला नाही, त्यांनी आता तो घेतला पाहिजे,” असा सल्ला गुलेरिया यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 aiims dr randeep guleria says first 14 days of january will be crucial sgy
First published on: 25-12-2022 at 10:48 IST