Corona Cases Rises in India, Mumbai-Delhi concerns : देशभरात पुन्हा एकदा करोनाने (कोव्हिड-१९) डोकं वर काढलं आहे. ताज्या माहितीनुसार आतापर्यंत देशभरात १,००० हून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७५२ रुग्णांची गेल्या पाच-सहा दिवसांत नोंद झाली आहे. सध्या सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमध्ये आतापर्यंत ४३० करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर महाराष्ट्रात २०९, दिल्लीत १०४, उत्तर प्रदेशात १५, पश्चिम बंगालमध्ये १२, गुजरातमध्ये ८३ व कर्नाटकात ४७ सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत.

दिल्लीत गेल्या एका आठवड्यात ९९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्ली, मुंबई व केरळसह देशभरात पुन्हा एकदा करोनाची भीती पसरली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात चार, केरळमध्ये दोन व कर्नाटकात एका करोनाबाधित रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे. मात्र शासकीय पातळीवरून या वृत्ताची पुष्टी करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र, दिल्ली व केरळमधील नागरिकांची चिंता वाढलेली असताना काही राज्ये व केंद्रशासित प्रदेश अद्याप करोनापासून चार हात लांब आहेत. अंदमान व निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीरमध्ये अद्याप एकही करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

पुन्हा लॉकडाऊनसारखी स्थिती?

देशाच्या राजधानीत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना दिल्ली सरकारने काही दिवसांपूर्वी एक विशेष अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत सर्व रुग्णलयांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. सरकारने रुग्णालयांना आदेश दिला आहे की करोनाशी लढण्यासाठी पूर्ण तयारी करून ठेवा. तसेच करोनाबाधित नमुने (सॅम्पल्स) जीनोम सीक्वेन्सिंगसाठी नायक रुग्णालयात पाठवा. करोनाच्या चाचण्या व त्याचे अहवाल दररोज दिल्ली राज्य आरोग्य विभागाला द्या, त्यांच्या संकेतस्थळावर व आयएचआयपी प्लॅटफॉर्मवर अपलोड करा, अशा सूचना आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तोंडावर मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांमध्ये अंतर ठेवा, स्वच्छता राखा, हात स्वच्छ ठेवा अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. पुन्हा लॉकडाऊनसारखी स्थिती नसली तरी तशी स्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. करोनापासून वाचण्यासाठीचे नागरिकांनी सर्व नियम पाळावेत असं आरोग्य विभागाने म्हटलं आहे.