करोना विरुद्धच्या लढाईत भारताला आणखी एक लस मिळण्याची शक्यता आहे. नोवाव्हॅक्सने भारतीय औषध नियंत्रण मंडळाकडे पहिल्या प्रोटीन आधारीत ‘कोवोव्हॅक्स’ लसीच्या आपतकालीन वापराची मंजुरी मागितली आहे. भारतात कोवोव्हॅक्स लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात १८ वर्षांवरील नागरिकांना लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तर लहान मुलांना या लसीचे डोस २०२२ या वर्षात उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलं आहे.

“लसीला मंजुरी मिळाल्यानंतर कोवोव्हॅक्सची किंमत सर्वांना कळेल. तर २०२२ या वर्षाच्या पहिल्या तिमाहित लहान मुलांसाठी ही लस उपलब्ध होईल.”, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितलं.

कोवोव्हॅक्स दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटिश व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. सप्टेंबर २०२०मध्ये नोवाव्हॅक्सने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता. २ बिलियन लसींची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. भारतात या व्हॅक्सिनला मान्यता मिळाल्यानंतर कोवोव्हॅक्स नावाने विकलं जाणार आहे. ही लस नोवाव्हॅक्सने विकसित केली आहे. करोनावर कोवोव्हॅक्स लसीचे दोन डोस प्रभावी असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. अमेरिकेत झालेल्या ट्रायलमध्ये गंभीर संक्रमित रुग्णांवर लस ९१ टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. तर मध्यम आणि हलक्या स्वरुपाच्या संक्रमणावर १०० टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.