सिद्धार्थ खांडेकर
ओल्ड ट्रॅफर्डवर भारताविरुद्ध रविवारी पाकिस्तानचे पतन झाले, त्याच्याबरोबर एक दिवस आधी अटलांटिक महासागर ओलांडून दक्षिण गोलार्धात सुरू असलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेटिनाचा – लिओनेल मेसीच्या अर्जेटिनाचा – कोलंबियाविरुद्ध ०-२ असा पाडाव झाला. दोन पराभवांमध्ये म्हटल्यास किती तरी हजार मैलांचे अंतर, पण नीट विचार केल्यास अनेक साम्यस्थळेही आढळतात. दोन्ही देश त्यांच्या-त्यांच्या खेळांमध्ये – म्हणजे क्रिकेटमध्ये पाकिस्तान आणि फुटबॉलमध्ये अर्जेटिना – नैसर्गिक गुणवत्तेची खाण मानले जातात. खेळाविषयी आसक्ती, पॅशन, जुनून दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये ठासून भरलेला आहे. यातूनच दरवेळी त्यांचा संघ मैदानात उतरल्यानंतर दिग्विजयी ठरलाच पाहिजे, या राक्षसी आणि अवाजवी अपेक्षेचा जन्म होतो. ती अपेक्षा पुरी झाली नाही, की मग राक्षसी आणि अवाजवी उद्वेगही व्यक्त होतो. या अपेक्षा-उद्वेगाच्या खेळातून मग खेळांच्या धुरीणांकडून काही पावले उचलली जातात किंवा जात नाहीत. यातून जे काही मंथन होते, ते भावनिक अधिक आणि व्यावहारिक कमी असते. त्यातून पुन्हा एकदा नवीन मोठय़ा स्पर्धेसाठी हे संघ उतरतात आणि अपेक्षा-उद्वेगाचे दुष्टचक्र अव्याहतपणे सुरूच राहते.
क्रिकेट विश्वचषक स्पर्धाच्या इतिहासात सात वेळा भारत आणि पाकिस्तान परस्परांशी भिडले आणि सातही वेळा भारताने बाजी मारली. या सातपैकी किमान पहिल्या चार स्पर्धामध्ये – १९९२, १९९६, १९९९, २००३ – कागदावर पाकिस्तानी संघाचे पारडे काहीसे जड होते. त्या काळात आणि विशेषत नव्वदच्या दशकात विश्वचषक सोडल्यास इतरत्र स्पर्धामध्ये पाकिस्तान भारताला बऱ्यापैकी सातत्याने हरवतही होता. पण विश्वचषक स्पर्धामध्ये प्रत्येक भारत-पाकिस्तान सामन्यात दडपण भारतीय क्रिकेटपटूंपेक्षा पाकिस्तानी क्रिकेटपटूंवरच अधिक असायचे. भारताच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे १९९२पासून सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटपटू भारतीय संघात स्थिरावलेला होता. सचिनकडे निव्वळ असामान्य गुणवत्ताच होती असे नव्हे, तर तो अत्यंत नीडरही होता. पाकिस्तानी संघ समोर असूनही दडपणाखाली न खेळण्याची सवय त्याने अंगी बाणवली होती. तीच सवय त्याच्या नंतर आलेल्या अजय जडेजा, मनोज प्रभाकर, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंदर सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंग, युवराज सिंग, गौतम गंभीर यांच्यात मुरायला वेळ लागला नाही. पुढे महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्या पिढीने तर पाकिस्तानला तेवढीही किंमत दिलेली नाही. असे का घडले असावे?
एक मुख्य कारण म्हणजे, क्रिकेट एके क्रिकेट आणि त्यातही पाकिस्तान एके पाकिस्तान हे समीकरण व्यापक आणि विकसित भारतीय मानसिकतेतून हद्दपार होऊ लागले होते. पाकिस्तानला आजतागायत ही चौकट मोडता आलेली नाही, कारण या चौकटीबाहेर पडण्याची त्यांची इच्छा नाही. क्रिकेट, काश्मीर आणि भारत या विषयांवर त्या देशात आजही चावडीपासून रावळपिंडीपर्यंत चर्चा झडतात. टीव्ही स्टुडिओंमध्ये बाकी सारे मूलभूत राष्ट्रीय, आर्थिक आणि सामाजिक प्रश्न सोडून क्रिकेटवर शिरा ताणून युक्तिवाद केले जातात. पाकिस्तानचा एके काळचा अत्यंत निष्णात कर्णधार आणि उत्तम क्रिकेटपटू आणि सध्या त्यांच्या पंतप्रधानपदावर विराजमान असलेला इम्रान खान परवाच्या सामन्यापूर्वी पाच-पाच ट्वीट्स जारी करून काय करा नि काय करू नका, असे पाकिस्तानी संघाला बजावतो! नाणेफेक जिंकून कोणत्या परिस्थितीत काय करावे हेही सांगतो? पंतप्रधानपदावरील व्यक्तीला बाकीचे व्याप नसतात काय?
भारतात आज परिस्थिती अशी आहे, की क्रिकेट आणि इतर सर्व प्रमुख खेळांमध्ये (टेनिस आणि नेमबाजी वगळता) ग्रामीण आणि निमशहरी भागांतून मुले-मुली मोठय़ा संख्येने भाग घेत असून उच्च पातळीवरही चमकत आहेत. याचे एक कारण म्हणजे आपण क्रिकेटपलीकडे पाहायला शिकलो आहोत. आणि क्रिकेटमध्ये पाकिस्तानपलीकडे पाहायला शिकलो आहोत. क्रिकेटप्रेमाला शिस्त, तंदुरुस्ती, तंत्रशुद्धता या संकल्पनांची जोड द्यायला शिकलो आहोत. परवाच्या सामन्याचा प्रचंड गाजावाजा देशभर आणि शेजारी देशात झाला. जगभरच्या भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटरसिकांमध्येही विशेषत: समाजमाध्यमांमधून याविषयी चर्चा सुरू होती. पण विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी हा इतर सामन्यांसारखाच एक सामना होता. त्यामुळेच बाद नसतानाही विराटने त्याची विकेट बहाल केली तेव्हा किंवा भुवनेश्वर कुमारसारखा खंदा गोलंदाज पाकिस्तानी डावाच्या सुरुवातीलाच जायबंदी झाला, तेव्हा विराट आणि त्याचे सहकारी अजिबात विचलित झाले नाहीत. त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला अवाजवी महत्त्व देणे सोडून दिले आहे. सध्याचा पाकिस्तानी संघ हा सामान्य ते सुमार अशा दोनच पातळ्यांवर हेलकावत असतो, हे त्याला ठाऊक झाले आहे. पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात ७-० हे समीकरण त्याच्या दृष्टीने अटळ आणि स्वाभाविक होते. निव्वळ आसक्तीवर विसंबून राहून आणि व्यवस्थेत कोणतेही बदल न करता, आराखडे न आखता, अवास्तव अपेक्षा बाळगल्यावर पाकिस्तानचे क्रिकेटमध्ये किंवा अर्जेटिनाचे फुटबॉलमध्ये असेच मातेरे होत राहणार. पाकिस्तान या वास्तवाचा जितक्या लवकर स्वीकार करेल, तितक्या लवकर त्यांची या दुष्टचक्रातून सुटका होऊ शकेल.