Crime News वाढदिवसाच्या पार्टीसाठी चाललेल्या १८ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. ओडिशा येथील ही घटना आहे. या घटनेबाबत पीडितेने तक्रार केली होती. ज्यानंतर या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला ओडिशा पोलिसांनी अटक केली.
नेमकी काय घटना घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ वर्षांची एक मुलगी वाढदिवसाच्या पार्टीसाठी चालली होती. तिच्या मैत्रिणीच्या घरापाशी ती पोहचत असताना काही जणांनी तिला निर्जन ठिकाणी नेलं. तिथे या मुलीला मारहाण करण्यात आली आणि तिचा लैंगिक छळ करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या मुलीला जखमी अवस्थेत टाकून ते नराधम पळून गेले. त्यानंतर ही मुलगी कशीबशी घरी पोहचली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घडल्या प्रकराचा या मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत आणि तिची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती तिच्या कुटुंबातील एका सदस्याने दिली. ओडिशातील जगतसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी या प्रकरणाबाबत काय सांगितलं?
पोलिसांनी सांगितलं की सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीला आम्ही अटक केली आहे. तसंच इतर जिल्ह्यांमध्ये आम्ही धाडी घालत आहोत. या प्रकरणातील इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल. ज्या ठिकाणी सामूहिक बलात्काराची घटना घडली त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमही गेली होती अशी माहिती पोलीस अधीक्षक भवानी शंकर यांनी दिली. या नराधमांना शोधण्यासाठी तीन पथकं तयार कऱण्यात आली आहेत असंही त्यांनी सांगितलं.