जगभरात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. करोनाच्या ओमायक्रॉन या प्रकारामुळे संसर्ग तुलनेने झपाट्याने वाढत आहे. तर, ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने होत असला तरी त्याची लक्षणं आणि परिणाम सौम्य आहेत, असं म्हटलं जातंय. यावरच आता जागतिक आरोग्य संघटनेनं भाष्य केलंय. ओमायक्रॉन हा घातक नसून सौम्य आहे, असं सांगणंच धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संसर्गजन्य रोग एपिडेमियोलॉजिस्ट आणि डब्ल्यूएचओच्या कोविड-१९ च्या टेक्निकल लीड मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या, “ओव्हरसिम्पलीफाइड नॅरेटिव्ह धोकादायक असू शकतात. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा हॉस्पिटलायझेशनचा धोका कमी दिसतोय. परंतु फक्त त्यामुळे ओमायक्रॉन हा एक सौम्य आजार आहे, असं म्हणणं धोकादायक आहे. कमी जोखीम असतानाही वाढती रुग्णसंख्या आश्चर्यचकित करणारी आहेत, त्यामुळे येत्या काळात रुग्णालयांमध्ये जागा मिळणार नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगा,” असं आवाहन त्यांनी केलं.

यापूर्वी देखील जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉनला गांभीर्यानं घेण्याचा सल्ला दिलाय. ओमायक्रॉन म्हणजे सर्वसाधारण सर्दी नाही. यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात लोकांच्या करोना चाचण्या करण्यात याव्यात. तसेच त्या रुग्णाचे निरीक्षण करण्यात यावे. जेणेकरुन करोनाची लाट येण्याआधीच आपण सज्ज असू, असे स्वामीनाथन म्हणाल्या होत्या.

कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर मुलांना वेदना किंवा ताप असल्यास ‘ही’ औषधे देऊ नका; भारत बायोटेकचा सल्ला

लसीकरण वेगाने करुन आपण करोना रुग्णाचं संक्रमण अथवा संसर्ग टाळू शकतो, त्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या महामारी शास्त्रज्ञ डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितलं. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं मंगळवारी सांगितले की, श्वसनमार्गाच्या वरील भागावर ओमायक्रॉन व्हेरियंट परिणाम करत असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे. त्यामुळे इतर व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य आढळत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous to suggest that omicron is mild says who hrc
First published on: 06-01-2022 at 12:35 IST