पीटीआय, नवी दिल्ली

देशापुढील सुरक्षेच्या आव्हानांमध्ये बदल होत आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केले. “एकीकडे देश सीमेवरील अस्थिरतेशी लढा देत असताना, समाजासमोर आता अत्याधुनिक गुन्हे, दहशतवाद आणि वैचारिक युद्धांचे आवाहन उभे आहे,” असा इशारा सिंह यांनी दिला. त्याचवेळी देशातील नक्षलवाद आटोक्यात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

पोलीस स्मृतीदिनानिमित्त दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना, राजनाथ सिंह यांनी २०४७मध्ये ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी बाह्य आणि अंतर्गत सुरक्षेमध्ये संतुलन साधण्याची निकड अधोरेखित केली. लडाखच्या हॉट स्प्रिंग भागामध्ये २१ ऑक्टोबर १९५९ रोजी चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) दहाव्या तुकडीचे पोलीस मारले गेले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पोलीस स्मृतीदिन पाळला जातो.

पोलीस आणि सैन्य वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत असले तरी देशाचे संरक्षण करणे हेच दोहोंचे समान ध्येय आहे, असे सिंह यांनी सांगितले. पोलीस एकाच वेळी गुन्हे घडू नये यासाठी आपले अधिकृत काम करतात आणि दुसरीकडे सामाजिक विश्वास कायम ठेवण्याचे नैतिक कर्तव्यही पार पाडतात, अशी प्रशंसा संरक्षणमंत्र्यांनी केली. “जनतेचा सतर्क सशस्त्र दले आणि दक्ष पोलिसांवर विश्वास असल्यामुळे ते आज शांतपणे झोपू शकतात,” असे ते म्हणाले.

देशात एकेकाळी नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा प्रदेश आता विकासाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, असे राजनाथ सिंह म्हणाले. देशात यशस्वी होत असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेचे श्रेय त्यांनी पोलीस, ‘सीआरपीएफ’, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि स्थानिक प्रशासनाला दिले.

पंतप्रधानांकडूनही आदरांजली

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांनीही पोलिसांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले की, “आम्ही आमच्या पोलिसांच्या शौर्याला सलाम करतो आणि त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करतो. त्यांच्या खंबीर समर्पणामुळे आपला देश आणि जनता सुरक्षित राहते.”

गुन्हे अधिक संघटित, अदृश्य आणि गुंतागुंतीचे झाले आहेत. समाजात गोंधळ माजवणे, विश्वास कमी करणे आणि देशाच्या स्थैर्याला आव्हान देणे हा त्यामागील उद्देश आहे.- राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री