Deputy Chief of Army Staff Lieutenant General Rahul Singh: “ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानसह चीन, तुर्कियेचाही सामना केला”, अशी माहिती भारताचे उप-लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी शुक्रवारी दिली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या पाठिशी चीन आणि तुर्कियेचा हात असल्याचे त्यांनी म्हटले. दिल्ली येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना राहुल सिंह म्हणाले, “पश्चिम भारताच्या सीमेवर भारत एका शत्रूशी लढत होता. मात्र वास्तवात भारत तीन शत्रूंना तोंड देत होता. आपल्यासमोर सीमेवर पाकिस्तान होता. मात्र चीनकडून त्यांना मदत दिली जात होती.”

लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांच्या भाषणाचा व्हिडीओ पीटीआयने शेअर केला आहे. ते म्हणाले, चीनकडून पाकिस्तानला सर्वतोपरी मदत दिली जात होती. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण मागच्या पचा वर्षात पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांवर नजर टाकली तर त्यातील ८१ टक्के चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे आहेत.

लेफ्टनंट जनरल राहुल सिंह पुढे म्हणाले, भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या संघर्षात चीनने आपल्या शस्त्रास्त्रांची चाचणी घेतली. चीनसाठी भारत-पाकिस्तान संघर्ष एका प्रयोगशाळेतील प्रयोगासारखा होता.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ७ मे रोजी भारताने जोरदार प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हवाई हल्ला केला. १९७१ च्या युद्धानंतरचा हा सर्वात मोठा संघर्ष होता. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त केले, असे पत्रकार परिषदेत म्हटले.

राहुल सिंह यांनी आपल्या भाषणात आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, शस्त्रविरामाबाबत जेव्हा डीजीएमओ स्तरावर चर्चा सुरू होती. तेव्हा पाकिस्तानला भारताच्या महत्त्वाच्या व्हेक्टर्सबद्दल आधीपासूनच कल्पना होती. चीनकडून पाकिस्तानला वेळोवेळी ही माहिती पुरविली जात होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने आयोजित केलेल्य कार्यक्रमात बोलताना राहुल सिंह यांनी चीनसह तुर्कियेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, चीनप्रमाणे तुर्कियेनेही पाकिस्तानला मदत देण्यात भूमिका बजावली.