पीटीआय, रांची
‘‘देशात संसदेत असो किंवा बाहेर कुठेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. जे मुक्तपणे बोलण्याचे धाडस करतात त्यांना तुरुंगात टाकले जाते. देशात भाषणस्वातंत्र्य उरलेले नाही,’’ असा आरोप करून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकार टीकेचे लक्ष्य केले.
झारखंडमध्ये काँग्रेसच्या दोन महिन्यांच्या ‘हाथ से हाथ जोडो’ या जनजागरण मोहिमेचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला. यावेळी झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यात पाकूर येथील गुमानी मैदानावर झालेल्या सभेत बोलताना खरगे यांनी संसदेत त्यांनी केलेल्या भाषणाचे काही भाग काढून टाकल्याबद्दल संताप व्यक्त केला.
‘हाथ से हाथ जोडो’ मोहिमेदरम्यान काँग्रेस कार्यकर्ते केंद्राच्या जनविरोधी धोरणांविषयी जागृती करण्यासाठी घरोघरी भेटी देतील. काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश पांडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर, राज्यमंत्री आलमगीर आलम आदी नेते या सभेस उपस्थित होते.
काँग्रेसनेच देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास केला आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. भाजप २०१४ मध्ये महागाई रोखण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आला. परंतु भाजप सत्तेत आल्यापासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि गरिबी वाढत आहे.- मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष