scorecardresearch

काँग्रेसचं पुनरुज्जीवन लोकशाही आणि समाजासाठी महत्त्वाचं – सोनिया गांधी

विधानसभा निवडणुकीत झालेला काँग्रेसचा पराभव धक्कादायक आणि दुःखदायक असल्याचंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतला काँग्रेसचा पराभव धक्कादायक आणि दुखःदायक आहे, असं प्रतिपादन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज केलं. पुढचा मार्ग आणखी कठीण आहे, ज्यामध्ये पक्षाची निष्ठा, इच्छाशक्ती आणि प्रतिकाराची क्षमता पणाला लागणार असल्याचंही त्या म्हणाल्या. जी २३ नेत्यांच्या टीकेला कोणतंही उत्तर न देता सोनिया गांधींनी आपण आपल्या पक्षाची एकता टिकवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं.

काँग्रेसच्या सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या,”नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालांनंतर तुम्ही सगळे नाराज आहात हे मी जाणतेच. हे निकाल धक्कादायक आणि दुःखदायक होते. मी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीला भेटून कामकाजाचा आढावा घेतला. मी इतर सहकाऱ्यांनाही भेटले. आपला पक्ष आणखी मजबूत कसा करायचा याबद्दल मला अनेक सूचनाही आल्या आहे. त्यापैकी अनेक सूचना या समर्पक आहेत आणि मी त्यावर काम करत आहे.

गांधी पुढे म्हणाल्या की चिंतन शिबिर घेणं हेही महत्त्वाचं आहे कारण त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर सहकाऱ्यांच्या आणि पक्षाच्या प्रतिनिधींच्या सूचना जाणून घेता येतात, त्यांचे विचार समजावून घेता येतात. आपल्या पुढे येणाऱ्या समस्यांचं निराकरण कऱण्यासाठीचा मार्ग आणि त्यावर लगेच करायची कार्यवाही याबद्दल या सहकाऱ्यांकडून महत्त्वाच्या सूचना येतात.

सोनिया गांधी म्हणाल्या की, पुढचा मार्ग आधीपेक्षाही कठीण असणार आहे. आपली निष्ठा, इच्छाशक्ती आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता या सगळ्याची आता परीक्षा असेल. आणि त्यासाठी आपल्या या विशाल संघटनेची एकता प्रत्येक पातळीवर टिकवून ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास मी सांगेन की मी ही एकता टिकवण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न करण्यास तयार आहे. काँग्रेसचं पुनरुज्जीवन ही फक्त आपल्यासाठीच महत्त्वाची गोष्ट नाहीये तर ते लोकशाही आणि आपल्या समाजासाठीही महत्त्वाचं आहे.

सोनिया गांधींनी भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका केली तसंच त्यांच्या फूट पाडण्याच्या आणि ध्रुवीकरणाच्या अजेंड्यावरही टीका केली. सत्ताधारी पक्षाचा फूट पाडणं आणि ध्रुवीकरण करणं हा अजेंडा आता जणू प्रत्येक राज्यातल्या राजकारणात रुळायला लागला आहे. ही अजेंड्याची आग आणखी पेटवण्यासाठी इतिहासाशी छेडछाड केली जात आहे, तथ्यांना सोयीस्कररित्या वेगळ्या पद्धतीने समोर आणलं जात आहे. या द्वेषपूर्ण शक्तीला आपल्याला रोखायचं आहे, या शक्तीविरोधात उभं राहायचं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Determined to do whatever needed to ensure party unity congress chief sonia gandhi vsk

ताज्या बातम्या