Meeting of Parliamentary Standing Committee : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल ९ दहशतवादी तळांवर कारवाई करत तळांना उद्ध्वस्त केलं. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवर केलेल्या ड्रोन हल्ल्याला देखील चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, त्यानंतर दोन्ही देशांत शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली होती.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची अधिकृत घोषणा होण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेची काही भूमिका होती का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. यावरून विरोधकांनी सरकारला अनेक सवाल विचारले होते. या या विरोधकांच्या प्रश्नांचं उत्तर सरकारकडून देण्यात आलं असून या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

भारत-पाकिस्तान तणावाच्या अनुषंगाने विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या एका विधानामुळेही विरोधकांनी काही सवाल विचारले होते. विरोधकांच्या सवालानंतर आज संसदेच्या परराष्ट्र व्यवहारांवरील स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सांगितली जात आहे. या बैठकीत विरोधकांच्या शंकांचं निरसन परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी केलं असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

शस्त्रसंधीत अमेरिकेची भूमिका होती का?

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीत तिसऱ्या देशाने हस्तक्षेप होता का? या विरोधकांच्या प्रश्नावर आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. परराष्ट्र सचिवांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितलं की, “दोन्ही देशांमधील शस्त्रविराम हा द्विपक्षीय निर्णय होता. तसेच त्यात अमेरिकेचा कोणताही हस्तक्षेप नव्हता”, असं परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केलं असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.

अणुयुद्धाचे संकेत मिळाले होते का?

भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकिस्तानकडून अणुयुद्धाचे संकेत मिळाले होते का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर परराष्ट्र मंत्र्यांनी हा संशय खोटा असल्याचं म्हटलं आहे. असे कोणतेही संकेत शेजारील राष्ट्रांकडून आले नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, या दोन्ही देशांतील संघर्ष पारंपरिक क्षेत्रात झाला होता, असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं वृत्तात म्हटलं आहे. या बरोबरच ऑपरेशन सिंदूर सुरू होण्यापूर्वी भारताने पाकिस्तानला कोणतीही माहिती दिली नसल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.