गुजरात दौऱ्यात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे प्रतिपादन

लोकांनी त्यांच्या मनातील फुटीरतावादी व विभाजनवादी विचार काढून टाकावेत आणि मन स्वच्छ करावे, असे आवाहन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मंगळवारी केले.
राष्ट्रपती तीन दिवसांसाठी गुजरातच्या दौऱ्यावर गेले असून मंगळवारी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले. त्या वेळी त्यांनी देशात सध्या सहिष्णुता आणि हिंसाचारामुळे कलुषित झालेल्या वातावरणाबद्दल मतप्रदर्शन केले.
रस्त्यावरची घाण ही खरी घाण नाही, मनातील वाईट विचारांची घाण काढली पाहिजे. समाजाला दुभंगणाऱ्या विचारांना स्थान देता कामा नये. ते आणि आपण, शुद्ध व अशुद्ध हे शब्द दुभंगलेपण दाखवतात. महात्मा गांधींची कल्पना सर्वसमावेशक देशाची होती. समाजातील प्रत्येक घटकाला समानतेने वागवले जावे व समान संधी मिळावी असे त्यांना अपेक्षित होते, असे मत मुखर्जी यांनी व्यक्त केले.
साबरमती आश्रमात गांधीजींच्या कागदपत्रांच्या संग्रहालयाचे व संशोधन केंद्राचे उद्घाटन त्यांनी केले. मुखर्जी म्हणाले की, स्वच्छ भारत योजना यशस्वी केली पाहिजे, पण ती सुरुवात आहे. आपण लोकांची मनेही स्वच्छ केली पाहिजेत, तरच गांधीजींचे स्वच्छतेचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.
त्यांनी गुजरात विद्यापीठात पदवीदानाचे भाषण केले. त्यात त्यांनी सांगितले की, गांधीजींचे जीवन व मृत्यू हा जातीय सलोख्याचा व शांततेचा लढा होता. त्यांनी समाजातील विघातक शक्तींना विधायक वळण देण्याचा प्रयत्न केला. भारतातील उदार परंपरा महत्त्वाच्या आहेत. अहिंसा नकारात्मक नाही. आपण आपला समाज सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून मुक्त केला पाहिजे. समाजातील वंचित, दीनदुबळय़ांना घेऊन लोकशाही पुढे गेली पाहिजे. गांधीजींनी रामनामाचा जप करतमारेकऱ्याच्या गोळ्या झेलल्या हा त्यांनी दिलेला अहिंसेचा वस्तुनिष्ठ धडा होता.महात्मा गांधींनी १९२० साली अहमदाबादेत स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठाच्या ६२व्या पदवीदान समारंभात राष्ट्रपती उपस्थित होते. या वेळी त्यांच्याहस्ते पदवीधरांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.