करोना व्हायरसमुळे द्रमुकचे आमदार जे. अन्बझागन यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. करोनाची लागण झाल्यानंतर आठवडयाभरापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते ६१ वर्षांचे होते. करोना व्हायरसमुळे आमदाराचा मृत्यू होण्याची देशातील ही पहिली घटना आहे.

जे. अन्बझागन यांना ज्या रुग्णालयात ठेवण्यात आले होते, त्यांनी प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले होते. पण मंगळवारी रुग्णालयाने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जाहीर केले. त्यांना आधीपासून किडनीचा त्रास होता. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली.

करोना व्हायरसच्या या संकटकाळात राज्यातील जनतेला मदत करण्यामध्ये जे. अन्बझागन मोठया प्रमाणावर सक्रिय होते. ते चेन्नई पश्चिमचे द्रमुकचे सरचिटणीसही होते. मागच्या मंगळवारी त्यांनी ताप, सर्दी आणि श्वासोश्वास करताना त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.