Donald Trump On Elon Musk : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती तथा टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर एलॉन हे देखील त्यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते. मात्र, नुकतंच काही दिवसांपूर्वी मस्क हे ट्रम्प सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर दोघांमधील मतभेद वाढले आणि आता या दोघांमध्ये तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

वेगवेगळ्या मुद्यांवरून दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील मैत्री शत्रुत्वात बदलण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत. मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाच्या एका नव्या विधेयकांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर दोघांमधील वाद वाढल्याचं सांगितलं जातं. यातच मस्क यांनी म्हटलं होतं की माझ्याशिवाय ट्रम्प निवडून आले नसते. एवढंच नाही तर जेफ्री एपस्टाईनला अमेरिकेत लैंगिक गुन्हेगार म्हणून दोषी ठरवण्यात आले होतं, या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव असल्याचा गंभीर आरोप मस्क यांनी केला होता.

तसेच मस्क यांनी थेट नव्या राजकीय पक्षाबाबत सूचक भाष्य देखील केलं होतं. या सर्व घडामोडींनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांना मोठा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी मस्क यांच्याबरोबरचं नातं आता संपलं असल्याचं म्हटलं आहे. तसेच मस्क यांना खूप गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं असा इशारा देखील दिला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

एनबीसी न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्याशी त्यांचे संबंध संपुष्टात आल्याचं स्पष्ट केलं. ट्रम्प यांनी म्हटलं की, ‘हो आमचे संबंध संपुष्टात आले असं मी आता गृहीत धरतो.’ तसेच मस्क यांच्याबरोबरचे संबंध सुधारण्याची आता कोणतीही इच्छा नाही आणि मस्क यांनी आगामी मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सना मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, असा मोठा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांना दिला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

मस्क यांच्याबाबत खूप निराश आहे.

मस्क यांनी केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, “मस्क आणि माझे पूर्वी चांगले संबंध होते. पण आता मला माहित नाही की आम्ही एकत्र राहू शकू की नाही? इलेक्ट्रिक-वाहनांवरील कराबाबतच्या निर्णयानंतर टेस्ला प्रमुख निराश झाले असावेत. मी देखील मस्क यांच्याबाबत खूप निराश आहे. मी त्यांना खूप मदत केली”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रम्प यांच्याशी वादानंतर मस्क यांनी नवीन राजकीय पक्षाचे दिले संकेत

ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर आता मस्क यांनी थेट राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. मस्क यांनी नुकतीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली असून त्या पोस्टमध्ये त्यांनी जनतेचा पोल घेतला आहे. त्यामध्ये मस्क यांनी असं म्हटलं आहे की, “अमेरिकेत ८० टक्के मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची वेळ आली आहे का?” असं म्हटलं. तसेच या प्रश्नावर अगदी ८० टक्के लोक सहमत असल्याचा दावाही त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. याबरोबरच ही पोस्ट शेअर करत द अमेरिका पार्टी असं सूचक नवीन नावही त्यांनी त्यात सूचवलं आहे. मस्क यांच्या या पोस्टमुळे ते नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या विचारात आहेत का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.