रशिया, चीन, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया हे देश अण्वस्त्रचाचण्या करत आहेत, असे म्हणत सांगून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने पुन्हा अण्वस्त्रचाचण्या सुरू करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. अमेरिकेने गेल्या तीन दशकांपासून अण्वस्त्रचाचण्या केलेल्या नाहीत.

दक्षिण कोरियाच्या बुसान येथे ‘अॅपेक’ परिषदेपूर्वी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेण्याआधी ट्रम्प यांनी अमेरिका पुन्हा अण्वस्त्रचाचण्या सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. यासंबंधी ‘सीबीएस न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी पाकिस्तानसह रशिया, चीन आणि उत्तर कोरिया अण्वस्त्रचाचण्या करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘रशिया आणि चीन अण्वस्त्रचाचण्या करीत आहेत. पण, ते त्याविषयी काही बोलत नाहीत. आम्ही वेगळे आहोत. आम्ही त्याविषयी बोलतो… आम्ही चाचण्या नक्कीच करू. कारण ते आणि इतर चाचण्या करीत आहेत. उत्तर कोरिया आणि पाकिस्तानही चाचण्या करीत आहेत.’’ आपण अण्वस्त्रे तयार केल्यावर त्याची चाचणीच केली नाही, तर कसे चालेल? अण्वस्त्रे काम करत आहेत, की नाही, हे कसे समजेल? असे प्रतिप्रश्नही ट्रम्प यांनी केले.

गेल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही रशियाने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या टॉर्पिडोची चाचणी घेतली होती.

या मुलाखतीत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आठ युद्धे थांबविल्याचा दावा केला. यामध्ये त्यांनी इस्रायल-हमाससह भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचाही उल्लेख केला. काही संघर्ष थांबविण्यासाठी करधोरणाचा वापर केल्याचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला.

शटडाउनवर तडजोड अमान्य

ट्रम्प यांनी सरकारी कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या दबावाला बळी पडणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारच्या तडजोडीस तयार होणार नाही, असे सांगितले. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेत सलग सहाव्या आठवड्यात सरकारी कामकाज बंद होते. ‘‘डेमोक्रॅटिक पक्ष रस्ता भरकटला आहे. या मुद्द्यावर ते रिपब्लिकन पक्षासमोर नांगी टाकतील,’’ असे ट्रम्प म्हणाले.