पीटीआय, वॉशिंग्टन

भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध त्या देशांच्या ‘स्मार्ट’ नेत्यांनी थांबविल्याचे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथमच युद्धविरामाचे श्रेय स्वत:कडे घेणे टाळले. विशेष म्हणजे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची भेट घेतल्यानंतर बुधवारी त्यांनी हे वक्तव्य केले.

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव होता. भारत-पाकिस्तानच्या लष्करांमध्ये चर्चेनंतर १० मे रोजी युद्धविराम झाला. मात्र तेव्हापासून युद्ध थांबविल्याचे श्रेय ट्रम्प घेत आले आहेत. ‘भारत-पाकिस्तानला व्यापार थांबविण्याची धमकी दिल्यामुळे त्यांनी शस्त्रसंधी केला,’ असा दावाही त्यांनी पूर्वी केला होता. मुनीर यांना बुधवारी ‘व्हाईट हाऊस’मध्ये मेजवानी देण्यात आली. त्यानंतर ट्रम्प यांनी ‘ओव्हल ऑफीस’मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, की मी काही दिवसांपूर्वी मोदी यांना भेटलो. मला आनंद आहे की दोन ‘स्मार्ट’ लोकांनी आणि अर्थात त्यांच्या अधिकाऱ्यांनी, युद्ध थांबविण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अणूयुद्ध होऊ शकले असते. दोघेही प्रचंड मोठे अण्वस्त्रसज्ज देश आहेत. यावेळी त्यांनी आपण युद्ध थांबविल्याचे सांगणे टाळले. दरम्यान, ट्रम्प यांनी द्विपक्षीय व्यापार वाढविण्याची इच्छा दर्शविल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आय लव्ह पाकिस्तान’

मुनीर यांच्या भेटीपूर्वी वॉशिंग्टनमधील एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी ‘आय लव्ह पाकिस्तान’ असे विधान केल्यामुळे भारतात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. ‘‘मी युद्ध थांबविले. माझे पाकिस्तानवर प्रेम आहे’’ असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले. मुनीर यांचा युद्ध थांबविण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता, अशा शब्दांत त्यांनी स्तुतिसुमने उधळली.