दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचं पथक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचलं आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच ईडीचं पथक चौकशीसाठी हजर झालं. यानंतर ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी ईडीच्या पथकाला घरात येण्यापासून रोखले. मात्र दिल्ली पोलिसांनी घराचा ताबा घेतला असून तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान ‘आप’च्या काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. आज रात्रीच या प्रकरणी सुनावणी घेऊन केजरीवाल यांची संभाव्य अटक टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘आप’च्या नेत्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते केजरीवाल यांना समन्स बजावण्यासाठी निवासस्थानी आले आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीच्या पथकाकडे छापेमारी करण्यासाठीचे वॉरंट असून त्यांनी निवासस्थानाची तपासणी सुरू केली आहे. केजरीवाल यांची चौकशी सुरू केली जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. मागच्यावर्षीपासून आतापर्यंत ईडीकडून केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स बजावण्यात आलेले आहे. मात्र केजरीवाल यांनी एकदाही समन्सला उत्तर दिले नाही.

‘पंतप्रधान मोदी लोकसभेआधी केजरीवालांना तुरुंगात टाकणार’, ईडीच्या नोटिशीनंतर ‘आप’चा आरोप

सौरभ भारद्वाज माध्यमांना माहिती देताना म्हणाले की, केजरीवाल यांच्या निवासस्थानी छापेमारी सुरू असल्याचे दिसते. आम्हाला कुणालाही आतमध्ये जाऊ दिले जात नाही. कदाचित मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्याची तयारी सुरू आहे.

‘आप’च्या नेत्या आणि मंत्री अतिशी यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “दिल्लीची जनता केजरीवाल यांना आपला भाऊ, मुलगा समजते. त्यांनी दिल्लीकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. यामुळेच पंतप्रधान मोदी केजरीवाल यांना घाबरतात. एका लोकप्रिय मुख्यमंत्र्याला अटक करण्याचा प्रयत्न कराल, तर असंख्य लोक त्यांच्या समर्थनार्थ पुढे येतील.”

केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीचे ६ ते ८ अधिकारी पोहोचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी आजच केजरीवाल यांना दहावे समन्स दिले आहे. याआधी नऊ समन्स देऊन झाले आहेत. तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचे अनेक पोलीस अधिकारीदेखील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अंतर्गत केजरीवाल यांची चौकशी केली जात असल्याचे सांगितले जाते.