पुन्हा विजयी चौकार: पंजाबचा ‘आप’ला हात, काँग्रेसचा पाचही राज्यांत धुव्वा

शेतकरी आंदोलन, करोना हाताळणी, बेरोजगारी आदी मुद्यांवरून विरोधकांनी उभे केलेले आव्हान मोडीत काढून भाजपने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी चौकार लगावला़  उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या ‘बुलडोझर’ने विरोधकांना भुईसपाट केलेच ; पण, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील सत्ताही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केल़े  पंजाबने काँग्रेसचा ‘झाडू’न धुव्वा उडवला़ ‘आप’ने दिल्लीपाठोपाठ तिथेही एकहाती सत्ता मिळवून राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने घोडदौड केली़  पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांच्या पक्षांतराने जेरीस आलेल्या काँग्रेसच्या आणि उत्तर प्रदेशात चार वेळा सत्तास्थानी राहिलेल्या बसपच्या अस्तित्वावर या निकालाने प्रश्नचिन्ह उभे केल़े