Elon Musk on Big Beautiful Bill Act : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेक्नोलॉजी क्षेत्रातील दिग्गज एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका केली आहे. मस्क यांनी ट्रम्प सरकारच्या नव्या कर व खर्च विधेयकावर (Tax and Spending Bill) जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या विधेयकाचा ‘घृणास्पद कृत्य’ असा उल्लेख केला आहे. तसेच ते म्हणाले, “या विधेयकामुळे खूप तोटा होईल”.
मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “माफ करा, परंतु मी आता हे सहन करू शकत नाही. काँग्रेसचं हे हास्यास्पद, घृणास्पद आणि महागडं विधेयक आहे. ज्या लोकांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं आहे त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे की त्यांनी चूक केली आहे”. मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाला इशारा दिला आहे की अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची तूट २.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल. यामुळे देशावरील कर्ज आणखी वाढेल.
ट्रम्प सरकारच्या ‘बिग ब्युटीफुल बिला’वर मस्क नाराज
अलीकडेच एलॉन मस्क यांनी गव्हर्नमेंट एफिशिएन्सी विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. संघीय खर्च कमी करण्याची जबाबदारी या विभागावर आहे. मात्र, मस्क हे सरकारबरोबरच्या वादातून या विभागातून बाहेर पडले आहेत आणि आता त्यांनी स्वतःला नव्या वादग्रस्त विधेयकापासून दूर ठेवलं आहे. सरकार स्थापनेनंतर अवघ्या चारच महिन्यांत एलॉन मस्क सरकारमधून बाहेर पडले आहेत. अर्थसंकल्पावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नव्या अर्थसंकल्पात काही कर सवलती व संरक्षण खर्च वाढवण्याचे प्रस्ताव होते. मात्र, मस्क यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच बिग ब्युटीफुल बिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कायद्यावर त्यांनी टीका केली आहे.
मस्क यांना ट्रम्प सरकारचं प्रत्युत्तर
दरम्यान, मस्क यांची नाराजी तसेच सरकारच्या कर व खर्च विधेयकावरील टीकेला व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, “या विधेयकाबद्दल मस्क काय विचार करतात हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आधीच माहिती होतं. परंतु, मस्क यांच्या टीकेमुळे किंवा अशा निर्णयामुळे ट्रम्प यांचे किंवा प्रशासनाचे मत बदलणार नाही. हे एक मोठं विधेयक आहे. अध्यक्ष या विधेयकावर ठाम आहेत”.