Elon Musk On Buddhism: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क त्यांच्या जवळच्या लोकांपैकी एक आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांना एक मोठी जबाबदारी देत त्यांना सरकारी कार्यक्षमता विभागाचे म्हणजेच ‘डोज’चे प्रमुख बनवले. एकीकडे सरकारी खर्च कमी करण्याचे ध्येय साध्य करण्यात ‘डोज’ मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले, तर दुसरीकडे, एकाच वेळी हजारो लोकांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीकाही झाली.
दरम्यान, एलॉन मस्क आता लवकरच हा विभाग सोडण्याचा विचार करत आहेत. अलिकडेच, एलॉन मस्क यांनी त्यांच्या अनुपस्थितीत ‘डोज’ कसे काम करेल या प्रश्नाचे एक आश्चर्यकारक उत्तर दिले आहे.
ज्याप्रमाणे बौद्ध धर्म गौतम बुद्धांशिवाय…
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्या कार्यकाळाचे १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त, मस्क यांनी माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देताना स्वतःची तुलना गौतम बुद्धांशी केली. जेव्हा एलॉन मस्क यांना विचारण्यात आले की, त्यांच्या अनुपस्थितीत ‘डोज’चे नेतृत्व कोण करेल, तेव्हा मस्क म्हणाले की, “ज्याप्रमाणे बौद्ध धर्म गौतम बुद्धांशिवाय टिकू शकला, त्याचप्रमाणे ‘डोज’चे काम देखील त्यांच्याशिवाय चालू शकते.” मस्क यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले की, “बौद्ध धर्माला बुद्धाची गरज आहे का? बुद्धांच्या मृत्युनंतर बौद्ध धर्म अधिक समृद्ध झाला नाही का?”
बौद्ध धर्मासारखी जीवन जगण्याची एक पद्धत
माध्यमांशी संवाद साधताना मस्क पुढे म्हणाले की, त्यांच्या अनुपस्थितीतही, ‘डोज’ सरकारी खर्च कमी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवेल. ते म्हणाले, ‘डोज’ एक बौद्ध धर्मासारखी जीवन जगण्याची एक पद्धत आहे.” दरम्यान, मस्क यांनी हे देखील मान्य केले आहे की, नोकरशाही हटवण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही लोकांना नोकरीवरून चुकून काढून टाकण्यात आले.
ट्रम्प यांची इच्छा असेपर्यंत…
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली, ‘डोज’ने जुलै २०२६ पर्यंत सरकारी खर्च १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मस्क म्हणाले की, त्यांच्या विभागाने आतापर्यंत सुमारे १६० अब्ज डॉलर्सपर्यंत सरकारी खर्च कमी करण्याचे लक्ष्य साध्य केले आहे. ट्रम्प यांची इच्छा असेल तोपर्यंत ते या विभागात काम करत राहतील असे मस्क यांनी म्हटले आहे.