ट्विटरचे मालकी हक्क मिळताच एलॉन मस्क यांनी ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर या कंपनीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कंपनीचं कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आलं आहे, असं ट्विटरकडून कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. ‘बीबीसी’नं या बाबतचं वृत्त दिलं आहे. ट्विटरनं हे पाऊल का उचललं याची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आली नाही. नव्या आदेशानंतर कंपनीचं कार्यालय आता २१ नोव्हेंबरला उघडणार आहे.
You’re Fired! कोणतीही नोटीस न देता मस्क यांनी ५५०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून ट्विटरमधून अनेक कर्मचारी राजीनामा देत आहेत. कार्यक्षमरित्या जास्त तास काम न केल्यास नोकरीचा राजीनामा देण्यास कर्मचाऱ्यांना सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर अथवा माध्यमांशी कंपनीच्या गोपनीय माहितीविषयी चर्चा करणं टाळा आणि कंपनीच्या नियमांचं पालन करा, असं ट्विटरकडून कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.
कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचा मोठा इशारा, म्हणाले “कंपनी दिवाळखोरीत…”
पहिल्या फेरीत कंपनीतील जवळपास साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढल्यानंतर ट्विटरकडून पुन्हा नोकरकपात करण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीत जवळपास साडेपाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्वसुचना न देता नोकरीवरून काढण्यात आल्याचं वृत्त ‘सीएनबीसी’नं दिलं आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच सर्वात आधी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली. त्यानंतर सीएफओ नेड सेगल, पॉलिसी चीफ विजया गड्डे यांनाही डच्चू दिला. दरम्यान, अनेक भारतीयांच्या नोकरीवरही गदा आली आहे. ट्विटरने भारतातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे.