तामिळनाडूत सरकारी कर्मचाऱ्याकडून लाच घेताना अंमलबजावणी संचलनालयाच्या ( ईडी ) अधिकाऱ्याला अटक केली आहे. २० लाख रूपयांची लाच घेताना राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ईडीच्या अधिकाऱ्याला अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंकित तिवारी असं अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याचं नाव आहे. अंकितला १५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंकित तिवारीच्या अटकेनंतर जिल्हा दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मदुराई येथील ईडीच्या कार्यालयात झाडाझडती घेतली. तसेच, तिवारीच्या निवासस्थानाचीही तपासणी करण्यात आली आहे.

‘इंडिया टुडे’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित तिवारी अनेकांना ब्लॅकमेल करून कोट्यवधींची लाच घेतल्याचा संशय आहे. तसेच, ईडी अधिकाऱ्यांनाही तिवारीने लाच दिली आहे. तिवारीकडून काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी मदुराई आणि चेन्नई येथील ईडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.

अंकित तिवारीचं नेमकं प्रकरण काय?

दिंडीगुल येथील एका सरकारी कर्मचाऱ्याला अंकित तिवारीने २९ ऑक्टोबरला बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणासंदर्भात संपर्क साधला होता. हे प्रकरण यापूर्वीच बंद करण्यात आलं होतं. पण, याप्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाने ( पीएमओ ) ईडीला चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचं अंकितने सरकारी कर्मचाऱ्याला सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर अंकितने कर्मचाऱ्याला पुढील तपासासाठी ३० ऑक्टोबरला मदुराई येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी सांगितलं. कर्मचारी ३० ऑक्टोबरला तेथे पोहचल्यावर त्याला तपास बंद करण्यासाठी ३ कोटी रूपयांची लाच मागितली. पण, नंतर ५१ लाख रूपयांची मागणी अंकितने कर्मचाऱ्याकडे केली.