पीटीआय, मनेसर
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दहशतवाद्यांसाठी आता कुठलीही जागा सुरक्षित नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे प्रमुख अड्डे, प्रशिक्षण केंद्रे, दहशतवादी गट उद्ध्वस्त झाले, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) ४१व्या स्थापना दिनानिमित्त ते ‘एनएसजी’च्या मुख्यालयात बोलत होते. ते म्हणाले, ‘‘भारताची सुरक्षा दले दहशतवाद संपविण्यासाठी अगदी पाताळातही जाण्यास कटिबद्ध आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले आणि ‘ऑपरेशन महादेव’मध्ये पहलगाम हल्ला घडवून आणणाऱ्यांचा खात्मा करण्यात आला.’’
कलम ३७० रद्द केल्यापासून सरकारने उचललेली पावले अमित शहांनी सांगितली. यामध्ये ‘यूएपीए’, ‘एनआयए’ कायद्यामधील सुधारणा, बेकायदा आर्थिक व्यवहारांवर ‘ईडी’च्या माध्यमातून प्रतिबंध, दहशतवाद्यांचा निधी रोखणे आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
‘एनएसजी’चे केंद्र अयोध्येत सुरू करणार असल्याचे शहा म्हणाले. सध्या मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, गांधीनगर येथे ‘एनएसजी’ची केंद्रे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णूतेचे धोरण स्वीकारले आहे. कलम ३७० रद्द करणे असो, सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट हवाई हल्ला, ऑपरेशन सिंदूर असो; सरकारी धोरणांचे विश्लेषण केले, तर लक्षात येईल, की भारताच्या सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांची मुळे, दहशतवाद्यांचे गट लक्ष्य केले आहेत. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
‘ऑपरेशन सिंदूर २.०’ अधिक विनाशकारी!
जम्मू : पाकिस्तानची भारताविरोधात लढण्याची क्षमता नाही. पण, ते पहलगामसारखे हल्ले करण्याचा प्रयत्न करतील. त्या देशाला उत्तर देताना ‘ऑपरेशन सिंदूर २.०’ झाले, तर ते अधिक विनाशकारी असेल, असा इशारा लष्कराच्या पश्चिम कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी मंगळवारी दिला. ते म्हणाले, ‘‘भारताला लचके तोडून घायाळ करण्याचे धोरण पाकिस्तान सुरूच ठेवेल. त्याचा सामना करण्यासाठी लष्कर पूर्ण सज्ज आहे. आता पुन्हा कारवाई करण्याची वेळ आली, तर ती पूर्वीपेक्षा अधिक विनाशकारी असेल. ‘ऑपरेशन सिंदूर २.०’ पहिल्यापेक्षा अधिक विनाशकारी असेल. यात कुठलीच शंका नाही.’’