काँग्रेसचे माजी नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. फालेरो यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी हा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे. काहीच दिवसांपूर्वी लुईझिन्हो फालेरो यांनी पक्षातून राजीनामा दिला होता. त्यापूर्वी, त्यांनी ममता बॅनर्जींचं भरभरून कौतुक देखील केलं होतं.

काँग्रेस सोडताना आपल्या समर्थकांना संबोधित करत लुईझिन्हो फालेरो म्हणाले होते की, “मी काँग्रेसमध्ये त्रस्त होतो. मला गोव्याचा हा त्रास संपवायचा आहे. जर माझं दुःख इतकं मोठं असेल तर कॉंग्रेससाठी मतदान करणाऱ्या गोव्यातील नागरिकांच्या दुर्दशेची कल्पना करा. गोव्याचं हे दुःख लवकरात लवकर संपवूया. गोव्यात एक नवी पहाट आणूया. मी वयाने म्हातारा असू शकतो, पण माझं रक्त तरुण आहे”. याचवेळी फालेरो यांच्या तृणमूल प्रवेशाबाबत चर्चा रंगू लागलात होत्या.

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लुईझिन्हो फालेरो म्हणाले की, “आज मी दीदींसोबत प्रवास सुरू करत आहे. कारण गोव्याला विश्वासार्ह पर्यायाची गरज आहे. मी त्यांना गोव्याची ओळख आणि वारसा जपण्यासाठी गोव्याला येण्याची विनंती करतो.”

माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट! | ममता बॅनर्जी

फालेरो यांच्या पक्षप्रवेशानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ट्विट करत म्हणाल्या की, “गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि ७ वेळा आमदार राहिलेले गोव्याचे नेते फालेरो यांचं तृणमूल काँग्रेसच्या कुटुंबात स्वागत करणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक गोवावासीयासाठी आपण एकत्र उभं राहू. फुटीरतावादी शक्तींशी लढा देऊ आणि गोव्यासाठी नवीन पहाट करण्याच्या दिशेने काम करू. “

ममता बॅनर्जी ‘स्ट्रीट फायटर’

एका भाषणादरम्यान फालेरो यांनी ममता बॅनर्जी यांच वर्णन ‘स्ट्रीट फायटर’ असं केलं आहे. ममता बॅनर्जी फुटीरतावादी शक्तींशी लढत आहेत, असंही ते म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तृणमूल काँग्रेस गोवा विधानसभा निवडणूक लढवेल!

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी अलीकडेच म्हटलं होतं की, “टीएमसी पुढील वर्षी गोव्यातील विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा करेल. पक्ष लवकरच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करेल. आम्ही इथे सत्ताधारी भाजपचे मोठे प्रतिस्पर्धी आहोत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील आमच्या पक्षात ‘हायकमांड संस्कृती’ नाही. त्या स्थानिक नेत्यांना उभे करतील”.