करोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शैक्षणिक वेळापत्रक कोलमडलं आहे. परीक्षांचा हंगाम असतानाच करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे केंद्रीय शैक्षणिक मंडळाबरोबर राज्यांतील अनेक शैक्षणिक मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द करत बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या. बारावीच्या परीक्षा कधी होणार? यावरूनही बरेच प्रश्न उपस्थित होताना दिसत असून, छत्तीसगड सरकारने बारावीची परीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. यासाठी राज्य सरकारने ओपन बुक पद्धतीने परीक्षा घेण्याचं ठरवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रासह राज्याराज्यांत दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यावरून पेच निर्माण झालेला असतानाच छत्तीसगड शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यावेळी ओपन बुक पद्धतीने परीक्षा घेण्यावरही शिक्षण मंडळाने शिक्कामोर्तब केलं असून, याचाच अर्थ विद्यार्थ्यांना घरातून परीक्षा देता येणार आहे. वाढत्या करोना संकटाचा विचार करून मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

छत्तीसगड शिक्षण मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार १ जूनपासून परीक्षा सुरू होणार आहे. १ ते ५ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. प्रश्नपत्रिका घेऊन गेल्यानंतर विद्यार्थ्यांना पाचव्या दिवशी उत्तरपत्रिका जमा कराव्या लागणार आहेत. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यांने १ जून रोजी प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर त्याला ५ रोजी उत्तरपत्रिका जमा कराव्या लागणार आहे. तसेच जर एखाद्या विद्यार्थ्यांने ५ जून रोजी प्रश्नपत्रिका घेतली असेल, त्याला १० जून रोजी उत्तरपत्रिका जमा कराव्या लागणार आहेत. विद्यार्थ्याला स्वतःला परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका आणाव्या लागणार आहेत. त्याचबरोबर स्वतःच जमा कराव्या लागणार आहेत. हे करत असताना विद्यार्थ्यांची स्वाक्षरीही घेतली जाणार आहे. पोस्टाने उत्तरपत्रिका पाठवल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. अशा ओपन बुक पद्धतीने परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्रात बारावीची परीक्षा घेण्यावर विचार सुरू…

अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाने परीक्षा घेण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारच्या निर्णयाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे एकूणच राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत नेमकं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “उच्च न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न आणि केंद्र सरकारची परीक्षांबाबतची भूमिका या एकूणच विषयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी येत्या दोन दिवसांत चर्चा होणार असून, त्यावेळी परीक्षांच्या मुद्द्यांवर सविस्तर विश्लेषण होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exam from home open book method cgbse chhattisgarh board 12th exam 2021 bmh
First published on: 23-05-2021 at 16:05 IST