उत्तराखंडमध्ये पाच जणांचा मृत्यू; केरळमधील बळींची संख्या २७ वर

देशातील अनेक राज्यांना सोमवारी अतिवृष्टीने तडाखा दिला. उत्तराखंडमध्ये विविध दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर अनुभवणाऱ्या केरळमध्ये मृतांचा आकडा २७ वर पोहोचला असून, तेथील दहा धरणांच्या क्षेत्रांत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तराखंड, दिल्लीबरोबरच राजस्थान, मध्य प्रदेश़, उत्तर प्रदेश, पश्चिाम बंगाल, तमिळनाडू, तेलंगण आदी राज्यांत सोमवारी मुसळधार पावसाची नोंद झाली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक नेत्यांना पोटनिवडणुकीचा प्रचारदौरा रद्द करावा लागला.

उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीशी संबंधित दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. हवामानात सुधारणा होईपर्यंत चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली. रविवारपर्यंत हरिद्वार व ऋषिकेशला येऊन पोहोचलेल्या चारधाम यात्रेकरूंना पुढे न जाण्याची सूचना प्रशासनाने केली. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

केरळमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने राज्यातील दहा धरणांना धोक्याचा लाल बावटा दाखवण्यात आला. कक्की धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. शबरीमला येथे अयप्पा मंदिराची यात्रा सध्या स्थगित करण्यात आली आहे, असे महसूल मंत्री के. राजन यांनी सांगितले.

दिल्लीत ६० वर्षांनंतरचा सर्वाधिक पाऊस

दिल्लीत १९६० नंतर ऑक्टोबर महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस ठरला. त्यावेळी दिल्लीत ऑक्टोबरमध्ये ९३.४ मिमी. पावसाची नोंद झाली होती. यंदा तिथे चालू महिन्यात ९४.६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० या कालावधीत दिल्लीत ८७.९ मिमी पाऊस नोंदवण्यात आला.