तेलंगणा सचिवालयातील सरकारी अधिकारी असल्याचे भासवून राज्यातील एका आमदाराला ९० हजार रुपयांना फसवणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.
आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्य़ातील रहिवासी असलेल्या थोटा बालाजी नायडू या आरोपीला शनिवारी हैदराबादच्या बंजारा हिल्स भागात अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त रमा राजेश्वरी यांनी दिली. थोटा याने ८ जून रोजी मलकानगिरीच्या आमदारांना दूरध्वनी करून स्वत:ची ओळख सचिवालयातील जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरणातील अधिकारी म्हणून दिली. त्याने आमदारांना काही शासकीय योजनांबाबत माहिती देऊन त्यांचा फायदा घेण्यासाठी सदस्यत्व शुल्काची रक्कम भरण्यास सांगितले. तेलंगणा सरकारने मोटार खरेदी, डेअरी फार्म उभारणे, किराणा दुकान इत्यादींसाठी ५० टक्के अनुदानाच्या योजना आखल्या असल्याचे तो म्हणाला. ‘कुटुंब संक्षेम अभिवृद्धी निधी’ या योजनेकरिता प्रत्येक सदस्यापोटी ३०० रुपये या हिशेबाने ३०० सदस्य करण्यासाठी ९० हजार रुपये जमा करण्यास नायडूने आमदारांना सांगितले. त्यासाठी त्याने दिलेल्या बँक खात्यात आमदारांनी ही रक्कम जमा केली. मात्र ही रक्कम जमा झाल्याची नायडूने पुष्टी केली नाही, तेव्हा असा कुठलाही इसम तेलंगणा सचिवालयात काम करीत नसून, अशा प्रकारची कुठलीही सरकारी योजनाही नसल्याचे उघडकीला आले, असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.
या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर थोटा नायडू ऊर्फ लक्ष्मण महेश या इसमाने मलकानगिरीच्या आमदाराला ९० हजार रुपयांना गंडवल्याचे लक्षात आले. अशीच कार्यपद्धती वापरून यापूर्वीही अनेक लोकप्रतिनिधींना फसवणाऱ्या थोटा याला याआधीही अटक करण्यात आली होती. गेल्या ३ जूनला तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा त्याने जुना धंदा सुरू केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.