अलीकडच्या काळात परदेशात शिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्यार्थी धडपड करत असल्याचे पाहायला मिळते. मात्र गेल्या काही वर्षांपासून परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. ७ मार्च पासून बेपत्ता झालेल्या अमेरिकेतील २५ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. मोहम्मद अब्दुल अरफाथ, असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मोहम्मद अब्दुल अरफाथ हा मुळचा हैदराबाद येथील होता. या वर्षातली ही ११ वी घटना आहे. ईदच्या महिन्यातच ही दुःखद घटना घडल्यामुळे अरफाथचे कुटुंबिय अशरक्षः कोलमडून गेले आहे. हातचा तरूण मुलगा तर गमावला, पण त्याच्या शिक्षणासाठी काढलेले ४३ लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न आता कुटुंबियांसमोर आ वासून उभा आहे.

मोहम्मद अरफाथचे वडील मोहम्मद सलीम यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना आपली व्यथा कथन केली. “मोहम्मद बरोबर काय झालं याचा विचार करून आम्हाला बराच मानसिक त्रास होत आहे. त्याच्याबरोबर काय झालं, याची कोणतीही माहिती आम्हाला अद्याप मिळालेली नाही. तो जेव्हापासून बेपत्ता झाला, तेव्हापासून आमचा एक एक दिवस मोठ्या अडचणीतून जात होता. मोहम्मद जिवंत परत येईल, अशी आस आम्हाला लागली होती. पण त्याचे पार्थिव आमच्यापर्यंत आले.”

अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, गेल्या वर्षभरातील नववी घटना

अरफाथ मे २०२३ मध्ये अमेरिकेतील क्लीव्हलँड विद्यापीठात माहिती आणि तंत्रज्ञान पदवी मिळविण्यासाठी गेला होता. हैदराबादच्या मलकाजगिरी येथे राहणाऱ्या कुटुंबियांशी त्याचा ७ मार्च रोजी संपर्क तुटला. ७ मार्च रोजी त्याचा फोन स्विच ऑफ झाल्यामुळे पालक चिंतेत होते. १७ मार्च रोजी त्यांना अमेरिकेतून एका अनोळखी नंबरवरून फोन आला. अरफाथचे अपहरण केले असून त्याच्या सुटकेसाठी १,२०० डॉलरची खंडणी मागण्यात आली होती. जर पैसे दिले नाहीत तर अरफाथची किडनी काढून विकू, अशी धमकी फोन करणाऱ्याने दिली होती.

या धमकीच्या फोननंतर अरफाथच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्रही लिहिले होते. कोणत्याही परिस्थितीत अरफाथला भारतात परत आणण्याची विनंती त्यांनी या पत्रद्वारे केली होती.

पाच वर्षांत ४०३ भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात मृत्यू; ‘या’ देशात सर्वाधिक विद्यार्थी मृत्यूमुखी

मोहम्मद सलीम यांनी सांगितले की, अरफाथ हा मितभाषी आणि उत्साही मुलगा होता. कोणत्याही वादापासून दूर राहण्याची त्याची वृत्ती होती. शाळेत त्याने अतिशय चांगेल गुण मिळवले होते. हैदराबादमधील महाविद्यालयातून त्याने कम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक केले होते.

मोहम्मद सलीम पुढे म्हणाले, इतर अनेक भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणेच त्याचेही अमेरिकेत जाऊन मास्टर करण्याचे स्वप्न होते. मागच्या दोन वर्षांपासून तो एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. अमेरिकेत जाऊन स्थायिक होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याने शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केल्यानंतर जेव्हा ४३ लाखांचे कर्ज मंजूर झाले, तेव्हा त्याचा आनंद ओसंडून वाहत होता. क्लीव्हलँड विद्यापीठात प्रवेश मिळेपर्यंत आमच्या जीवनात सर्व काही सुरळीत सुरू होते.

अरफाथला आम्ही काहीही कमी पडू देणार नाही, असा शब्द दिला होता. पण आम्हाला याची कल्पना नव्हती की त्याच्या जीवाचे बरेवाईट होईल. त्याला कोणतीही वाईट सवय नव्हती. त्याचे अपहरण कसे झाले? त्याला का मारले? असे अनेक प्रश्न आमच्यासाठी अनुत्तरीत आहेत. आमचा हातचा मुलगा तर गेलाच. पण आता त्याच्यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे? असा आमच्यासमोर प्रश्न आहे, असेही अरफाथचे वडील मोहम्मद सलीम म्हणाले.