जम्मू : ‘‘जम्मू-काश्मीरला जोवर न्याय मिळत नाही, तोवर येथील हत्या थांबणार नाहीत. जर येथील स्थिती सुव्यवस्थित असती तर काश्मिरी पंडितांची हत्या झाली नसती,’’ असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. जम्मू-काश्मीरसाठी लागू असलेला अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर येथील स्थिती सुव्यवस्थित झाल्याचा दावा भाजप करत आहे. त्यावर टीका करताना ते बोलत होते.

दक्षिण काश्मीरमध्ये शोपियाँ जिल्ह्यातील चौधरी गुंड परिसरात पूरण कृष्ण भट या पंडिताची शनिवारी दहशतवाद्यांनी गोळी झाडून हत्या केली होती. त्यांच्या वडिलोपार्जित घराच्या बाहेर त्यांच्यावर हा हल्ला झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पत्रकारांशी संवाद साधताना अब्दुल्ला म्हणाले, की जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हत्या थांबणार नाहीतच. काश्मीरमधील दहशतवाद हा अनुच्छेद ३७० लागू असल्याने फोफावला, असा आरोप भाजप करत असे. सध्या काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्यात आले आहे. तरीही अशा हत्यांच्या घटना घडत आहे. जर येथील स्थिती नियमित झाली असती तर निष्पाप काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या नसत्या. मला जम्मू-काश्मीरमधील स्थिती पूर्वपदावर आली, असे अजिबात वाटत नाही. नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीसह काश्मीरमधील चार पक्ष ‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन’ (पीएजीडी) अशी आघाडी करून जम्मू-काश्मीरला अनुच्छेद ३७० अनुसार विशेष दर्जा बहाल करण्याच्या मागणीसाठी संघर्ष करत आहे.