कर्नाटकातील बेंगळुरू येथील ओमायक्रॉन प्रकाराने संक्रमित डॉक्टरचा करोना अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. भारतात भेटलेल्या पहिल्या दोन लोकांमध्ये या डॉक्टरांचा समावेश आहे. अहवालानुसार, ओमाक्रॉनमधून डॉक्टर बरे झाले होते, पण आता त्यांचा अहवाल कोविड-१९ पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, पुन्हा ओमायक्रॉनचे संक्रमण झाले आहे की आणखी कोणत्या प्रकाराची लागण झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

४६ वर्षीय डॉक्टरांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. जेव्हा ओमायक्रॉनच्या दोन प्रकरणांची भारतात प्रथमच नोंद झाली, तेव्हा या व्यतिरिक्त एक दक्षिण आफ्रिकेचा नागरिक होता. मात्र, नंतर तो दुबईला निघून गेला. अधिकाऱ्यांना न कळवता देश सोडून गेलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आता या डॉक्टरांनी ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर आढळलेल्या लक्षणाबद्दल माहिती दिली आहे. त्यांना जास्त ताप नव्हता आणि फक्त शरीरात हलके दुखणे, थंडी वाजून येणे आणि सौम्य ताप होता. नाव गुप्त ठेवू इच्छिणाऱ्या डॉक्टरची दुसऱ्यांदा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता सर्व ठीक आहे असे त्यांनी म्हटले आहे. संसर्गाबद्दलच्या त्याच्या अनुभवाचे वर्णन करताना, ते म्हणाले की. “चिंता करण्यासारखे काहीही नाही. कारण इतर प्रकारच्या संसर्गाच्या बहुतेक प्रकरणांपेक्षा त्याला श्वसनाची कोणतीही मोठी लक्षणे नव्हती.” त्यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, त्यांना सर्दी किंवा खोकला देखील झाला नाही आणि ऑक्सिजनचे प्रमाण देखील सामान्य होते.

“लक्षणे दिल्यानंतर मी स्वतःला एका खोलीत वेगळे केले आणि माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या संपर्कात आलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी चाचणी झाली आणि RAT आणि RT-PCR दोन्ही चाचण्या कोविडसाठी पॉझिटिव्ह आल्या, असे ते म्हणाले. दरम्यान, या डॉक्टरांनी कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

डॉक्टरांनी सांगितले की ते तीन दिवस घरी होता, पण चक्कर आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले. “माझी ऑक्सिजन लेव्हल ९६-९७ होती पण मला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. म्हणून मी रुग्णालयात दाखल झालो आणि त्याच दिवशी मोनोक्लोनल ऍन्टीबॉडीजने उपचार केले. मला वाटतं २५ नोव्हेंबरला हे झाले. पण त्यानंतर मला एकही लक्षण दिसून आले नाही.” त्यांच्यामध्ये २१ नोव्हेंबरपासून लक्षणे दिसायला सुरुवात झाली आणि दुसऱ्या दिवशी ते पॉझिटिव्ह आढळले.

जेव्हा त्यांची पहिली पॉझिटिव्ह चाचणी झाली तेव्हा विषाणू शोधण्यासाठी जीनोमिक सिक्वेन्सिंग केले गेले. ते म्हणाले की मोनोक्लोनल अँटीबॉडीसह उपचार २५ नोव्हेंबरच्या संध्याकाळी सुरू झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला कोणतीही लक्षणे नव्हती. अगदी सौम्य ताप किंवा स्नायू दुखण्यासारखा प्रकार देखील झाला नाही.

हिंदुस्तान टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे की डॉक्टर ओमायक्रॉनची लागण झाल्याची माहिती मिळण्याच्या एक दिवस आधी बेंगळुरू येथे एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले होते. १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ही परिषद झाली. या परिषदेत डॉक्टरांच्या सहभागानंतर बीबीएमपीचे अधिकारी या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. यातील अनेकांचा शोधही लागला आहे.