Doctor Murder in Target Killing in Delhi : उपचार करण्यासाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी डॉक्टरांची हत्या केल्याचा प्रकार दिल्लीतील एका नर्सिंग होममध्ये गुरुवारी मध्यरात्री घडला. आता या हत्येचा छडा लागला असून या प्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. डेक्कन हेरल्डने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अटक करण्यात आलेला अल्पवयीन मुलगा त्याच्या मित्राबरोबर गुरुवारी मध्यरात्री १ वाजता खड्डा कॉलनीतील एका अरुंद गल्लीत असलेल्या तीन खाटांच्या निमा रुग्णालयात प्रथोमपाचारासाठी आले होते. त्यांनी डॉ. जावेद अख्तर यांना गोळ्या घालून ठार केले. धक्कादाय म्हणजे, हत्या केल्यानंतर हे दोघेही पळाले. त्यातील एकाने सोशल मीडियावर फोटो टाकून कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “शेवटी २०२४ मध्ये हत्या केली.”
पोलिसांकडून टार्गेट किलिंगचा दावा
याप्रकरणी पोलिसांनी नर्सिंग होमच्या महिला परिचारिका आणि तिच्या पतीचीही चौकशी केली आहे. सह पोलीस आयुक्त एसके जैन यांनी सांगितलं, ही हत्या एकाच परिसरात राहणाऱ्या दोन मुलांनी केलेली टार्गेट किलिंग होती. त्यापैकी एकाला हापूर येथून अटक करण्यात आली आहे. मात्र, या गुन्ह्यामागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही. इतर आरोपींना पकडण्यासाठी पथके तैनात करण्यात आली असून तेही अल्पवयीन आहेत.
पोलीस म्हणाले, या दोघांनी ड्रेसिंग रुममध्ये कपाऊंडरची भेट घेतली आणि केबिनमध्ये जाऊन डॉक्टरवर गोळ्या झाडल्या. अटक करण्यात आलेला आरोपी अल्पवयीन असून त्यानेच डॉक्टरवर गोळीबार केला. त्याचे हे कृत्य नर्सिंग होममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक चौकशी करण्याकरता सहा पथके तयार करण्यात आली असून नर्सिंग होमच्या आतून आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या पथकांनीही मुख्य आरोपीला पकडण्यात मदत केली.
रुग्णालयात नेमकं काय घडलं होतं?
दोन अल्पवयीन मुले रुग्णालयात आले होते. त्यातील एकाच्या बोटाला जखम झाली होती. या जखमेवर रुग्णालयातील परिचारिकांनी ड्रेसिंग केली. ड्रेसिंग केल्यानंतर ही अल्पवयीन मुलं डॉक्टरांना भेटायला केबिनमध्ये गेली. तिथे त्यांनी डॉक्टरच्या डोक्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केबिनच्या दिशेने धाव घेतली. परंतु, तोवर अल्पवयीन मुलं पसार झाली होती. तसंच, डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. दरम्यान, त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलावून घटनेची चौकशी सुरू केली.