Delhi Firecrackers Ban : दिल्लीत प्रदूषणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात. आता या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्यानंतर अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे दिल्ली सरकारने आता महत्वाचा निर्णय घेत १ जानेवारी २०२५ पर्यंत फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या उत्पादनासह विक्रीवर बंदी असणार आहे.

दसरा उत्सवानंतर राजधानीतील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीवरून खाली घसरली होती. त्यामुळे दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या आदेशाने १ जानेवारी २०२५ पर्यंत दिल्लीच्या प्रदेशात सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या उत्पादनासह स्टोरेज, विक्री, ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे वितरण आणि सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनाही यासंदर्भातील सूचना देत फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

हेही वाचा : Sanjay Singh Gangwar : Video : “गायीच्या गोठ्यात झोपलं तर कर्करोग बरा होतो, तर ब्लड प्रेशर…”, भाजपा नेत्याच्या विधानाची चर्चा

दरम्यान, मंत्री गोपाल राय यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एक्सवर (ट्विटर) म्हटलं आहे की, “हिवाळ्यात वाढते प्रदूषण लक्षात घेता आजपासून १ जानेवारीपर्यंत फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली सरकारने बंदीच्या सूचना जाही केल्या आहेत. मी सर्व दिल्लीकरांना सहकार्य करण्याचे आवाहन करतो”, असं मंत्री गोपाल राय यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

दरम्यान, आता काही दिवसांवर दिवाळी आली आहे. मात्र, दिल्लीत यंदाही फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारी २०२५ पर्यंत फटाक्यांच्या उत्पादनासह विक्री आणि फटाके फोडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.