IAF Chief AP Singh: ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे मोठे नुकसान केल्याची माहिती हवाई दलाचे प्रमुख एपी सिंग यांनी बंगळुरू येथे बोलताना दिली आहे. ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर दोन महिन्यांनी त्यांनी हा मोठा खुलासा केला आहे. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीमुळे पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि हवाई देखरेखेसाठी असलेले एक मोठे विमान नष्ट करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
बंगळुरू येथे १६ व्या एअर चीफ मार्शल एलएम कात्रे मेमोरियल लेक्चरमध्ये भाषण करत असताना एपी सिंग यांनी ही माहिती दिली. तसेच त्यांनी काही फोटोही दाखवले. पाकिस्तानच्या नुकसानाबाबत ही अधिकृत माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे.
एपी सिंग पुढे म्हणाले की, १० मे रोजी भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. तेव्हा जेकबाबाद हवाई तळावरील अमेरिकन बनावटीची एफ १६ विमाने नष्ट करण्यात आली होती.
ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना एअर चीफ मार्शल सिंग म्हणाले, “आमच्या हवाई संरक्षण प्रणालीने उत्तम काम केले. आपण अलीकडेच खरेदी केलेली एस-४०० हे उपकरण गेमचेंडर ठरले. या प्रणालीमुळे आपण पाकिस्तानच्या विमानांना दूर ठेवू शकलो. जसे की, त्यांच्याकडे असलेल्या लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बला ते वापरू शकले नाहीत. कारण एस-४०० मुले ते जवळपास येऊ शकले नाहीत.”
“विमानांव्यतिरिक्त आपण मोठ्या संख्येने युएव्ही आणि ड्रोन्सही नष्ट केले. त्यांची काही क्षेपणास्त्रे आपल्या हद्दीत पडली होती. आम्ही त्याचे अवशेष गोळा केले आहेत. या अवशेषांचा अभ्यास सुरू आहे. जेणेकरून ती कुठून सोडण्यात आली, त्यांनी कोणता मार्ग अवलंबला होता. क्षेपणास्त्र सोडणारी प्रणाली कशी आहे आणि त्याची क्षमता किती आहे, याची माहिती आम्हाला मिळू शकेल”, असेही एपी सिंग यांनी सांगितले.