दक्षिण काश्मीरमध्ये सोमवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत निमलष्करी दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत. श्रीनगरपासून ६० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुलगाम जिल्ह्यातील वानपोह गावात ही घटना घडली. केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) तुकडी याठिकाणच्या रस्त्यावरून जात असताना दहशतवाद्यांनी त्यांना ग्रेनेडने लक्ष्य केले. मात्र, दहशतवाद्यांचा नेम चुकल्याने ग्रेनेड रस्त्याच्या बाजूला पडले. सद्यस्थितीत कुलगाम हा जिल्हा काश्मीरमधील सर्वात अशांत जिल्हा आहे. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ९० जण मारले गेले आहेत. यामध्ये सर्वात जास्त व्यक्ती कुलगाम जिल्ह्यातील आहेत. तत्पूर्वी आज सकाळी बंदिपूर जिल्ह्यात गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (एलओसी) हे ठिकाण जवळ आहे.

Story img Loader