परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सोमवारपासून पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जात असून त्या दरम्यान करोनावरील लस आणि देशांतर्गत लस उत्पादनाला चालना देण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या खरेदीबाबत ते प्रामुख्याने चर्चा करणार आहेत.

जयशंकर हे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अ‍ॅन्थनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा करणार असून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन प्रशासनातील अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. जयशंकर हे २४ ते २८ मे या दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रथमच भारतीय मंत्री अमेरिकेला रवाना होणार आहेत. भारतातील लस उत्पादनाला चालना देण्यासाठी अमेरिकेतून अधिक शीघ्रगतीने कच्च्या मालाचा पुरवठा व्हावा यासाठी जयशंकर आग्रह धरणार आहेत, असे कळते.

अमेरिकेच्या संरक्षण उत्पादन कायद्यान्वये (डीपीए) अमेरिकेतील कंपन्यांवर कच्च्या मालाची निर्यात करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी फेब्रवारी महिन्यात अमेरिकेने निर्यात मर्यादित करण्यासाठी डीपीए लागू केला. दोन्ही देशांमध्ये आर्थिक आणि कोविड-१९ संबंधित सहकार्याबाबतही ते चर्चा करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

कर्नाटक : टाळेबंदीत वाढ

बंगळुरू : कर्नाटकमध्ये करोना नियंत्रणात आणण्यासाठी ७ जूनपर्यंत टाळेबंदीत वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने जाहीर  केला. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर हा निर्णय जाहीर केला. जनतेच्या आरोग्याबाबत चिंता वाटत असल्याने आणि तज्ज्ञांनी सूचना केल्याने टाळेबंदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनता आम्हाला पूर्ण सहकार्य करील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सध्याच्या निर्बंधांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.