माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांना उत्तर प्रदेश न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. उत्तर प्रदेश न्यायालयाने आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणात हा निर्णय दिला आहे. पाच वर्षांपूर्वी जयाप्रदा यांनी आचारसंहितेचा भंग केला होता. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. तसंच इतर दोन प्रकरणाच्या सुनावणीलाही जया प्रदा उपस्थित राहिलेल्या नाहीत. जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही लागू करण्यात आला आहे. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतरही जया प्रदा न्यायालयासमोर आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आलं आहे.
२०१९ मध्ये काय घडलं?
२०१९ मध्ये भाजपाने जया प्रदा यांना लोकसभा निवडणुकीचं तिकिट दिलं होतं. त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाचे उमेदवार आजम खान उभे होते. २०१९ च्या लोकसभा प्रचाराच्या दरम्यान जयाप्रदा यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हा आरोप लागण्याचं कारण म्हणजे त्यांनी नूरपुर या गावात रस्त्याचं उद्घाटन केलं. या प्रकरणात जयाप्रदा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याच प्रचाराच्या वेळी जया प्रदा या कैमरी भागातल्या पिपलिया गावात पोहचल्या तेव्हा तिथल्या सभेत त्यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं. हे प्रकरणही पोलीस ठाण्यात गेलं आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जयाप्रदा यांना फरार घोषित करण्यात आलं आहे
२०१९ मध्ये घडलेल्या दोन प्रकरणांमध्ये कैमरी आणि स्वार ठाण्यात दोन्ही प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे. त्यानंतर विशेष न्यायालयात चार्जशीट फाईल करण्यात आली. जया प्रदा यांची साक्ष या प्रकरणात नोंदवायची आहे. गेल्या काही तारखांना त्यांना बोलवण्यात आलं. यानंतर त्यांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्या कोर्टात हजर झाल्या नाहीत. यानंतर आता न्यायालयाने जयाप्रदा यांना थेट फरार घोषित केलं आहे.
शोभित बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष न्यायालयाने रामपूर पोलीस अधीक्षकांना जयाप्रदा यांना अटक करून कोर्टात हजर करण्यात यावं असे आदेश दिले आहेत. पोलीस जयाप्रदा यांचा शोध घेत आहेत. मुंबई आणि इतर ठिकाणी जया प्रदा यांचा शोध घेतला जातो आहे. सातत्याने समन्स बजावूनही जया प्रदा कोर्टात हजर राहिल्या नाहीत त्यामुळे त्यांना फरार घोषित करुन त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.