लष्करप्रमुखांचे स्पष्टीकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामागे पाकिस्तानच्या शक्तिशाली लष्कराचा हात असल्याच्या वृत्ताचे लष्करप्रमुख जन. कमर जावेद बाजवा यांनी खंडन केले आहे. आपण लोकशाहीचे कट्टर समर्थक असल्याचेही बाजवा यांनी स्पष्ट केले आहे.

नॅशनल असेंब्ली आणि सिनेटच्या संरक्षणविषयक समितीच्या सदस्यांनी सोमवारी लष्कराच्या मुख्यालयास भेट दिली त्यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना बाजवा उत्तर देत होते. सुरक्षा कारवाई, लष्करी न्यायालये, संरक्षण विभागाचा अर्थसंकल्प, भारत-पाकिस्तान तणाव, नागरी-लष्करी संबंध आदी विषयांवर सदस्यांनी प्रश्न विचारले, असे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे.

पनामा पेपर्समध्ये पाकिस्तानच्या लष्कराचा हात असल्याच्या अफवेचे बाजवा यांनी खंडन केले, आपण लोकशाहीचे कट्टर समर्थक असून पार्लमेण्टच्या सार्वभौमत्वावर आपला विश्वास असल्याचे बाजवा यांनी या प्रतिनिधींना सांगितल्याचे डॉनने म्हटले आहे.

नवाझ शरीफ यांना पदावरून पायउतार करण्यामागे लष्कराचा हात नव्हता आणि सध्याचे पंतप्रधान पूर्वीच्या पंतप्रधानांप्रमाणेच उत्तम आहेत, असे लष्करप्रमुखांनी म्हटल्याचे एका लोकप्रतिनिधीने सांगितल्याचे वृत्तही डॉनने दिले आहे.

नव्याने समन्स

इस्लामाबाद : भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबतच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने पाकिस्तानच्या न्यायालयाने मंगळवारी पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ आणि सध्या लंडनमध्ये असलेल्या त्यांच्या मुलांवर नव्याने समन्स बजावले.

पाकिस्तानच्या न्यायालयात मंगळवारी प्रथमच सुनावणी झाली, त्यासाठी नवाझ शरीफ, त्यांचे पुत्र हसन आणि हुसेन आणि कन्या मरियम यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. नवाझ शरीफ यांची पत्नी आजारी असून सध्या लंडनमध्ये उपचार घेत असल्याने शरीफ तेथे गेले आहेत, असे शरीफ यांच्या वतीने न्यायालयात हजर राहणाऱ्या आसिफ किरमाणी या शरीफ यांच्या राजकीय सल्लागारांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. शरीफ लवकरच परततील, असेही किरमाणी म्हणाले.

संपूर्ण शरीफ कुटुंबीय सध्या लंडनमध्ये असल्याने न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २६ सप्टेंबपर्यंत तहकूब केली आणि नव्याने समन्स बजावण्याचे आदेश दिले. शरीफ कुटुंबीयांच्या लंडनमधील पत्त्यावर समन्स पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former pakistan pm nawaz sharif pakistan army chief
First published on: 20-09-2017 at 03:49 IST