Bengal Gangrape Case: पश्चिम बंगालच्या पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयामागील जंगलात शुक्रवारी (१० ऑक्टोबर) रात्री एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या घटनेनंतर पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. या पाच जणांमध्ये पीडितेच्या मित्राचाही समावेश होता. पश्चिम बंगाल पोलिसांनी मंगळवारी (१४ ऑक्टोबर) घटनास्थळावर शुक्रवारी रात्री काय घडले? याचा घटनाक्रम उलगडल्यानंतर पीडितेच्या मित्राला अटक केली.

आसनसोल-दुर्गापूरचे पोलिस उपायुक्त अभिषेक गुप्ता म्हणाले, शुक्रवारी रात्री पीडितेबरोबर बाहेर पडलेल्या तिच्या मित्राला आम्ही अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे. या मित्रावर आमचा सुरुवातीपासून संशय होता. मागच्या तीन दिवसांपासून त्याची चौकशी सुरू होती.

पोलिसांनी पुढे सांगितले की, पीडित आणि तिचा मित्र त्याच खासगी महाविद्यालयात शिकतात. शुक्रवारी घटना घडल्यापासून हा मित्र सतत जबाब बदलत होता. त्यामुळेच इतर पाच आरोपींवर बलात्कार आणि गुन्हेगारी कटाचे जे कलम दाखल केले आहेत, तेच या मित्रावरही दाखल करण्यात आले. बुधवारी त्याला न्यायालयात सादर केले जाईल.

पोलीस आणि महाविद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि तिचा मित्र शुक्रवारी रात्री ७.५८ वाजता महाविद्यालयाच्या संकुलातून बाहेर पडले. त्यानंतर मित्र एकटाच ८.४२ वाजता संकुलात परतला. त्यानंतर तो ८.४८ वाजता पुन्हा महाविद्यालयातून बाहेर पडला. त्यानंतर दोघेही रात्री ९.२९ वाजता महाविद्यालयाच्या संकुलात पोहोचले.

पीडितेच्या वडिलांनीही तक्रार दाखल करताना तिच्या मित्रावर संशय व्यक्त केला होता. पीडितेच्या वडिलांनी म्हटले की, तिच्या मित्राने तिला रात्री निर्जनस्थळी सोडून पळ काढला.

नेमके प्रकरण काय?

शुक्रवारी रात्री पीडितेला महाविद्यालयाच्या संकुलाबाहेरून चार ते पाच जणांच्या टोळक्याने फरफटत बाजूच्या जंगलात नेले आणि तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बलात्कार करणाऱ्या आरोपींपैकी एकाने तिचा मोबाइल हिसकावून घेतला होता. तो परत देण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी केली. पीडित विद्यार्थिनी सध्या रुग्णालयात दाखल असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.

मंगळवारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेने आपला जबाब नोंदवला होता. यात तिच्या मित्रानेही तिचा छळ केल्याचा आरोप केला आहे.

गुन्ह्याच्या घटनास्थळी सर्व आरोपींना नेऊन घटनेचा क्रम उलगडण्याचा प्रयत्न पोलिसांनी मंगळवारी केला. पोलीस उपायुक्त सुनील चौधरी यांनी सांगितले की, पीडितेने आपल्या जबाबात तिच्या मित्राविरोधात आधीच साक्ष दिली होती. तसेच पाच आरोपींपैकी केवळ एकानेत लैंगिक अत्याचार केल्याचेही तिने सांगितले. सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. आम्ही न्यायवैद्यक आणि विधी-वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहोत. त्यानंतर या प्रकरणात अधिक बोलता येईल.