फ्रान्समध्ये आल्प्स पर्वताच्या दुर्गम भागात जर्मनविंग्जचे प्रवासी विमान कोसळण्याची कारणे काय, याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. विमानातील ‘कॉकपीट व्हाईस रेकॉर्डर’वरून मिळालेल्या माहितीनुसार विमानाचा अपघात होण्यापूर्वी दोन वैमानिकांपैकी एकजण कॉकपीटच्या बाहेर गेला होता. दुर्घटना घडण्यापूर्वी तो परत कॉकपीटमध्ये येऊ शकला नाही, हे सुद्धा या रेकॉर्डिंगवरून समजले आहे.
विमानाला अपघात झाला त्यावेळी आल्प्स पर्वताच्या दुर्गम भागामध्ये आकाश निरभ्र होते. तरीही हे विमान कसे काय कोसळले, याचा शोध घेण्यात येतो आहे. या शोधकार्यात सहभागी असलेल्या एका अधिकाऱय़ाने सांगितले की, विमानाने उड्डाण केल्यानंतर दोन्ही वैमानिकांमध्ये सुसंवाद होता. थोड्यावेळाने एक वैमानिक कॉकपीटमधून बाहेर आला. पण त्यानंतर कॉकपीटचा दरवाजा आतून बंद झाल्यामुळे तो परत कॉकपीटमध्ये जाऊ शकला नाही, असे व्हॉईस रेकॉर्डिंगवरून समजते.
कॉकपीटच्या बाहेर असलेला वैमानिक सातत्याने दरवाजा ठोठावत असल्याचे रेकॉर्ड झाले आहे. मात्र, आतील वैमानिकाने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. आतून कोणताही प्रतिसाद येत नाही, हे कळल्यावर बाहेरील वैमानिकाने जोरजोरात दरवाजा वाजविण्यास सुरुवात केली. तरीही आतून कोणताही आवाज आला नाही. बाहेरील वैमानिकाने दरवाजा जोरजोरात वाजवून तोडण्याचाही प्रयत्न केला. तरीही आतून कोणताही आवाज आला नाही, असे व्हॉईस रेकॉर्डिंगवरून स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
बाहेर गेलेल्या वैमानिकाने कॉकपीटचा दरवाजा वाजवूनही आतील वैमानिकाने प्रतिसाद का दिला नाही, याचे कोडे उलगडत नसल्याचेही अधिकाऱयाने सांगितले.