कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (दि. २१ मार्च) ईडीकडून अटक करण्यात आली. मागील काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसाठी ईडीकडून तब्बल ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, तरीही अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणे टाळले. अटकेच्या कारवाईनंतर आता अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी जर्मनीने एक टिप्पणी केली. जर्मनीच्या टिप्पणीनंतर भारताने संतप्त प्रतिक्रिया देत जर्मनीला खडेबोल सुनावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर्मनीने काय टिप्पणी केली होती?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत म्हटले होते, “अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणाची आम्ही दखल घेतली असून भारत लोकशाही देश आहे. केजरीवाल यांना निष्पक्ष खटला चालवण्याची संधी मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.”

हेही वाचा : “तुरुंगातून टोळ्या चालवल्या जातात, सरकार नाही” भाजपा खासदार मनोज तिवारी यांची तिखट प्रतिक्रिया!

भारताने काय प्रतिक्रिया दिली?

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या प्रकरणावर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने टिप्पणी केल्यानंतर भारताने नाराजी व्यक्त करत जर्मनीला खडेबोल सुनावले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जर्मन राजदूताकडे यासंदर्भात निषेध व्यक्त केला. तसेच जर्मनीने केलेली टिप्पणी ही भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप असल्याचे म्हटले.

“आम्ही अशा प्रकारच्या टिप्पण्यांना देशाच्या न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करणे किंवा आमच्या न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर हल्ला करण्याच्या दृष्टीने पाहतो. भारत हा कायद्याच्या राज्यासह एक बळकट लोकशाही असणारा देश आहे. या प्रकरणामध्ये कायदा योग्य तो मार्ग स्वीकारेल. मात्र, जर्मनीने केलेले वक्तव्य अयोग्य आहे”, असे भारताने म्हटले.

केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे काढण्यात येत आहेत. अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्ली सरकारचे काय होणार? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. यावर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी स्पष्टीकरण देत “केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील, तसेच ते तुरुंगातून आपली कर्तव्ये पार पाडतील”, असे सांगण्यात आले. मात्र, यावर भाजपाचे नेते मनोज तिवारी यांनी टीका केली. “तुरुंगातून टोळ्या चालवल्या जातात, सरकार नाही”, असा निशाणा त्यांनी ‘आप’च्या नेत्यांवर साधला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Germany on delhi liquor scam arvind kejriwal arrest and india on germany marathi news gkt
First published on: 23-03-2024 at 19:04 IST