संघ परिवाराकडून माफीची मागणी; मदानींची केंद्र सरकारवर टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दहशतवादी संघटना आयसिस यांची तुलना करून नव्या वादाला तोंड फोडले. आझाद यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपने केली आहे.

आम्ही ज्या पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करतो त्याप्रमाणेच आयसिस या दहशतवादी संघटनेला करतो, आमच्यातील इस्लामला मानणारे जे चुका करतील त्यांना आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा कमी लेखणार नाही, असेही आझाद म्हणाले. जमियात उलेमा-ए-हिंदूने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवावी आणि त्यांनी वक्तव्य मागे न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असे भाजपने म्हटले आहे.  यापूर्वी पं. जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांनी संघटनेला दाबून टाकण्याचा प्रयत्न केल  असे भाजपने म्हटले आहे.

दरम्यान मोदी सरकारच्या काळात अल्पसंख्याकांवर हल्ले होत असल्याचा आरोप जमाते उलेमा -ए -हिंदचे अध्यक्ष मौलाना सय्यद अर्शद मदानी यांनी केला. धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकजूट करावी असे आवाहन त्यांनी केले.

देशात सध्या अत्यंत कठीण परिस्थिती -सोनिया

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या कार्यक्रमाला हजर नव्हत्या. मात्र त्यांचा संदेश या वेळी वाचून दाखविण्यात आला. सध्या जे सत्तेत आहेत ते धर्मनिरपेक्षतेवर हल्ला चढवून समाजात तिरस्कार पसरवीत आहेत, त्यामुळे देश सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत जमियात उलामा-ए-हिंदू यांनी काँग्रेससह महत्त्वाचे योगदान दिले आहे, सध्याच्या स्थितीत जमियातने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, देशाच्या ऐक्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून त्या प्रयत्नांना यश येईल, अशी अपेक्षा गांधी यांनी व्यक्त केली.