गुलाम नबी आझाद यांनी आपल्या काँग्रेसमधील सर्व पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसला. आझाद यांच्या राजीनामान्यानंतर पक्षाला चांगलीच गळती लागली. गुलाम नबी आझाद यांना पाठिंबा देण्यासाठी जम्मू-काश्मीरमधून अनेक काँग्रेस नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर आझाद आता कोणते पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान गुलाम नबी आझाद सध्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यांची आज जाहीर सभा होणार असून, या सभेत ते मोठा निर्णय जाहीर करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- ‘पंतप्रधानांवर टीका करणं जोखमीचं’ म्हणणाऱ्या SC च्या माजी न्यायमूर्तींना भाजपाने दिलं उत्तर, म्हणाले “हे लोक अभिव्यक्ती…”

नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता

गुलाम नबी आझाद हे आजपासून १५ सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये असणार आहेत. यादरम्यान लोकांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आझाद पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. सैनिक कॉलनीत ते जाहीर सभा घेणार आहेत. या जाहीर सभेत साधारण २० हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुलाम नबी आझाद आज या जाहीर सभेत आपल्या नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. आझाद यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.

हेही वाचा- “काँग्रेस देशातून नष्ट…”, अमित शाह यांचं मोठं विधान, म्हणाले “भाजपाच तुमचं भविष्य”

राहुल गांधींवर निशाणा साधत दिला होता राजीनामा

गुलाम नबी आझाद आता नव्या पक्षाची स्थापना करुन जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. राजीनामा देताना आझादांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना चार पानी पत्र लिहले होते. या पत्रात त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि खासकरुन जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर याआधी असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली असा आरोप त्यांनी पत्रात केला होता. तसंच पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारुन कोणताही अनुभव नसणारे पक्षाचं कामकाज चालवू लागले असंही ते म्हणाले आहेत.