Procter And Gamble (P&G) Announced That It Would Discontinue Business In Pakistan: गेल्या काही वर्षांत दिग्गज बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पाकिस्तानमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. अशात आता प्रॉक्टर अँड गॅम्बलसारख्या मोठ्या कंपनीनेही पाकिस्तानातील त्यांचे उत्पादन आणि व्यावसायिक उपक्रम बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात शेव्हिंगसाठी जिलेट रेझर आणि केस धुण्यासाठी हेड अँड शोल्डर्स शॅम्पू मिळणे कठीण होणार आहे.

प्रॉक्टर अँड गॅम्बलच्या या निर्णयानंतर अनेक पाकिस्तानी लोक सोशल मीडियावर साबण, सौंदर्यप्रसाधने आणि जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याबद्दल भीती व्यक्त करत आहेत. लाहोरमधील नदीम खान या निराश सोशल मीडिया युजरने एक्सवर पोस्ट केली की, “मला पी अँड जी चा हा निर्णय समजला नाही. २४ कोटी पाकिस्तानी लोकांना अजूनही साबण, डिटर्जंट आणि शेव्हिंग क्रीमची गरज आहे. कम ऑन, याला काहीच अर्थ नाही.”

१९९१ मध्ये पाकिस्तानी बाजारपेठेत प्रवेश करणारी प्रॉक्टर अँड गॅम्बल ही कंपनी खूप कमी वेळात पाकिस्तानातील सर्वोत्तम ग्राहकोपयोगी वस्तू पुरवणाऱ्या कंपन्यांपैकी एक बनली होती. त्यांच्या परवडणाऱ्या आणि विविध उत्पादनांच्या श्रेणीने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले होते. अल्पावधीतच, हेड अँड शोल्डर्स, पॅन्टीन, टाइड, ओरल-बी, जिलेट, ओल्ड स्पाइस, एरियल सारखे ब्रँड घराघरात लोकप्रिय झाले होते.

प्रॉक्टर अँड गॅम्बल ही बहुराष्ट्रीय कंपनी अचानक बाहेर पडल्याने पाकिस्तानी नागरिक बाजारात स्वस्त आणि खराब पर्यायांमुळे चिंतेत आहेत. इस्लामाबादमधील इंजिनिअर जावेद इक्बाल यांनी गेल्या तीन महिन्यांपासून बाजारात त्यांचा आवडता जिलेट रेझर मिळाला नाही याबद्दल दुःख व्यक्त केले.

“मी नेहमीच दाढी करण्यासाठी जिलेट ब्लू ३ रेझर वापरत आलो आहे, परंतु गेल्या ३ महिन्यांपासून मला तो बाजारात (इस्लामाबाद) मिळाला नाही. तो उच्च दर्जाचा रेझर आहे आणि उपलब्ध असलेला एकमेव पर्याय म्हणजे ट्रिट, जो तुलनेत खूपच खराब आहे”, असे इक्बाल यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.

दुसऱ्या युजरने असे निदर्शनास आणून दिले की, पाकिस्तानमध्ये चिनी उत्पादनांच्या प्रवेशामुळे पी अँड जीचे जिलेट, पॅम्पर्स, साबण आणि सौंदर्य उत्पादने पूर्णपणे नष्ट झाली आहेत.

तिसऱ्या युजर हिना सफी यांना प्रश्न पडला आहे की, आता पी अँड जी द्वारे विकली जाणारी सामान्य घरगुती उत्पादने पाकिस्तानी नागरिक कशी विकत घेतील? त्यांनी एक्सवर विचारले की, “तर मग पी अँड जी पाकिस्तान सोडत असल्याने आपल्याला एरियल, सेफगार्ड, विक्स, पॅम्पर्स, ऑलवेज, पॅन्टीन आणि अगदी हेड अँड शोल्डर्स देखील आयात करावे लागणार आहे का?”